IND vs PAK, ICC T20 World Cup 2026 : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराचे हत्यार उपसून पाकिस्तानने वातावरण तापवले. मात्र अखेर पुन्हा एकदा पाकिस्तान पलटी बहाद्दर ठरला. बांगलादेशला पाठिंबा देण्याच्या बहाण्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पाक सरकारच्या माध्यमातून एक अर्थहीन डाव खेळला होता. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी आयसीसीसमोर काही अटी ठेवल्या गेल्या होत्या. यात भारतासोबतच्या द्विपक्षीय मालिकेचाही मुद्दा चर्चेत आणण्यात आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानची अब्रु पुन्हा चव्हाट्यावर, पण...
मात्र आयसीसीने पाकिस्तानच्या सर्व मागण्या फेटाळून लावल्या. त्याचबरोबर बांगलादेशसह इतर क्रिकेट बोर्डांनीही पाकिस्तानला एकटे पाडल्यावर, अखेर त्यांना आपला निर्णय बदलावा लागला. आता भारत–पाकिस्तान सामना होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानची अब्रू पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मात्र ‘लाज गेली तरी माज’ ही ओळख कायम ठेवणारे पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ICC किंवा भारताला घाबरत नाही, असे म्हणत त्यांनी थेट पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे नाव घेतले आहे. नक्वी नेमके काय म्हणाले? क्रिकेटमध्ये राजकारण आणल्यावर आता लष्कराला या प्रकरणात ओढून त्यांनी नेमकं काय सिद्ध करायचं आहे? जाणून घेऊया सविस्तर.
ICC चा ‘तो’ मास्टरस्ट्रोक आणि पाकिस्तान भारताविरुद्ध खेळण्यास झाला तयार, नेमकं काय घडलं?
"आम्ही जे केलं ते बांगलादेशसाठी, आमच्यासाठी काहीच नाही"
टी-२० वर्ल्ड कपमधील भारताविरुद्धच्या सामन्याबाबत अंतिम निर्णय होण्याआधी, जेव्हा मोहसिन नक्वी यांना विचारण्यात आले की आयसीसीसोबतच्या चर्चेत पाकिस्तानने स्वतःसाठी काही सवलती मिळवल्या आहेत का, तेव्हा त्यांनी याला स्पष्टपणे नकार दिला. आम्ही आमच्यासाठी काहीच मागितलेलं नाही, असे नक्वी म्हणाले. यानंतर त्यांना विचारण्यात आले की, काही चांगली बातमी मिळणार आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले की, आम्ही तर नेहमीच चांगली बातमी देतो. तुम्ही बांगलादेशचं वक्तव्य पाहिलं असेल. त्यांनी पाकिस्तानकडे विनंती केली आहे की आम्ही सामना खेळावा. याचा अर्थ त्यांचा विषय पूर्णपणे मिटलेला आहे. आम्ही बांगलादेशसाठी ठामपणे उभे राहिलो होतो, त्यांच्या वतीने चर्चा केली. मात्र स्वतःसाठी काहीच केलं नाही.
ICC आणि भारताच्या धमक्यांना घाबरत नाही
याच दरम्यान मोहसिन नक्वी यांनी थेट पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर यांचे नाव घेतले. उल्लेखनीय बाब म्हणजे, नक्वी हे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री देखील आहेत. आयसीसीकडून कारवाईची धमकी मिळाल्यामुळे पीसीबी दबावात आहे, हे आरोप त्यांनी फेटाळून लावत म्हटले, "मला भारत किंवा आयसीसीच्या धमक्यांची भीती नाही. पाकिस्तान सरकारलाही नाही. आणि फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर यांच्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे—ते कधीच घाबरत नाहीत."
क्रिकेटचा मुद्दा थेट सरकार–लष्करापर्यंत नेण्याचा प्रयत्न?
भारत–पाकिस्तान टी-२० वर्ल्ड कपमधील हाय-व्होल्टेज सामन्याचा तिढा सुटत असतानाच, मोहसिन नक्वी यांनी जाणीवपूर्वक लष्करप्रमुखांचे नाव घेतल्याचे दिसते. क्रिकेटचा मुद्दा केवळ क्रीडाविश्वापुरता न ठेवता, तो थेट सरकार आणि लष्कराशी जोडलेला संदेश बनवण्याचा हा प्रयत्न असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. या वक्तव्यामुळे भारत–पाकिस्तान सामन्याआधीच वातावरण तापवण्याचा उद्देश स्पष्ट दिसून येतो. आयसीसी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळातही या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
पाकिस्तानची जुनी खोड; म्हणूनच भारत-पाक सामन्यांत 'तो' प्रकार घडला
टी-२० वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या आशिया कप स्पर्धेतही भारत–पाकिस्तान वाद चर्चेचा विषय ठरला होता. राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मैदानात उतरताना नक्वी यांनी केलेली वक्तव्ये आणि पाकिस्तान संघाच्या खेळाडूंना फायटर विमानाच्या पार्श्वभूमीवर दाखवणारे पोस्टर वादग्रस्त ठरले होते. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत बीसीसीआय आणि भारतीय संघाने ठाम भूमिका घेतली होती..सामना खेळायचा, पण हस्तांदोलन नाही. इतकेच नव्हे, तर ट्रॉफी जिंकल्यानंतरही मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी न स्वीकारता मायदेशी परतत खेळात राजकारण खपवून घेणार नाही, हा संदेश दिला होता.