Join us
Daily Top 2Weekly Top 5

MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम

Star Cricketer Retirement: धोनीच्या मार्गदर्शनाखाली त्याची कारकिर्द अधिक बहरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 19:29 IST

Open in App

Mohit Sharma Retirement: चेन्नई सुपर किंग्जमधील महेंद्रसिंग धोनीचा लाडका वेगवान गोलंदाज आणि टीम इंडियाकडून वर्ल्डकप खेळलेला स्टार खेळाडू मोहित शर्मा याने क्रिकेटला रामराम ठोकला. मोहित शर्माने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मोहितने २०१५ मध्ये टीम इंडियाकडून शेवटचा सामना खेळला होता. त्याने २६ वनडे आणि ८ टी२० सामन्यांमध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले. वनडे सामन्यांमध्ये त्याने ३१ गडी बाद केले तर टी२० सामन्यांमध्ये त्याच्या नावावर केवळ ६ विकेट्सचीच नोंद झाली.

इंस्टाग्रामवर निवृत्तीची घोषणा करताना मोहितने लिहिले की, आज मी मनापासून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो. हरयाणाचे प्रतिनिधित्व करण्यापासून ते भारताची जर्सी घालण्यापर्यंत आणि आयपीएलमध्ये खेळण्यापर्यंत हा प्रवास एका आशीर्वादाप्रमाणे होता. माझ्या कारकिर्दीचा पाया बनल्याबद्दल हरयाणा क्रिकेट असोसिएशनचे खूप खूप आभार. आणि अनिरुद्ध सरांचा मी मनापासून आभारी आहे. त्यांच्या सल्ल्याने आणि माझ्यावरील विश्वासाने माझा मार्ग सुकर झाला आणि मला यश मिळवता आले. त्यांनी केलेली मदत आणि मार्गदर्शन मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

मोहितने बीसीसीआय, त्याचे प्रशिक्षक, सहकारी, आयपीएल फ्रँचायझी, सपोर्ट स्टाफ आणि त्याच्या सर्व मित्रांचेही प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले. त्याने त्याच्या पत्नीचे विशेष आभार मानले. तिने नेहमीच त्याचे मूड स्विंग्ज आणि राग नीट हाताळला आणि प्रत्येक गोष्टीत त्याला पाठिंबा दिला असे त्याने नमूद केले. तो खेळाची नवीन पद्धतीने सेवा करण्यास उत्सुक आहे असे म्हणत त्याने कोचिंग किंवा इतर व्यवस्थापनातील जबाबदाऱ्यांसाठी तयार असल्याचे दाखवून दिले.

मोहित शर्माने क्रिकेट कारकीर्दीत अनेक चढ-उतार पाहिले. भारतीय संघाकडून खेळताना त्याने गोलंदाजीने अनेक वेळा प्रभावित केले. आयपीएलमध्येही त्याने आपला ठसा उमटवला. धोनीच्या मार्गदर्शनाखाली त्याची कारकिर्द अधिक बहरली. गोलंदाजीतील मिश्रण ही त्याची खासियत होती. त्यासाठी त्याचे अनेकदा कौतुक झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mohit Sharma Retires: Dhoni's Favorite Bowler Ends Cricket Career

Web Summary : Mohit Sharma, Chennai Super Kings' bowler and World Cup player, retires from cricket. Representing India in ODIs and T20s, he thanks his coach, Haryana Cricket Association and family for their support. He looks forward to serving the sport in a new way, indicating a possible role in coaching or management.
टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सभारतीय क्रिकेट संघ