Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मद शामीने पोस्ट केला शिवलिंगाचा फोटो, सोशल मीडियावर झाला ट्रोल

भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शामीला पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. ट्रोल करणारे मोहम्मद शामीला इस्लामची शिकवणी घेण्याचा सल्ला देत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 19:10 IST

Open in App

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शामीला पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. ट्रोल करणारे मोहम्मद शामीला इस्लामची शिकवणी घेण्याचा सल्ला देत आहेत. झालं असं होतं की, मोहम्मद शामीने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी शुभेच्छा देताना त्याने शिवलिंगाचा एक फोटो शेअर केला होता. मोहम्मद शामीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये एक शिवलिंग दिसत होतं, ज्याला फुलांनी सजवण्यात आलं होतं, आणि तिथेच फुलांनी हॅप्पी न्यू इअर 2018 लिहिलं होतं. मोहम्मद शामीच्या या पोस्टनंतर लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

मोहम्मद शामीला ट्रोल करणा-यांमध्ये मुस्लिमांचा जास्त समावेश आहे. यामधील काही लोक नववर्ष तुलाच लखलाभो असा टोला मारत आहेत. आम्ही एक मुसलमान असून, आमचं नववर्ष मोहरमला सुरु होतं असं सांगत आहेत. एका युजरने तर लवकर सुधर, नाहीतर अल्ला तुझा नाश करेल असं म्हटलं आहे. 

मोहम्मद शामी सध्या भारतीय संघासोबत दक्षिण अफ्रिकेत आहे. 5 जानेवारीला दक्षिण अफ्रिकेविरोधातील पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ 56 दिवसांच्या दक्षिण अफ्रिका दौ-यावर आहे. दक्षिण अफ्रिकेत भारत तीन कसोटी, सहा एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघासाठी हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. याच दौ-यात भारतीय संघाची खरी कसोटी लागणार आहे. 

2017 सालात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारतीय संघानं आपलं वर्चस्व कायम राखलं. कसोटी, वन-डे आणि टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत भारताने सरत्या वर्षाचा शेवटही गोड केला. गतवर्षी भारतानं 14 मालिकांसह 37 सामने जिंकण्याचा पराक्रम केला.  मात्र 2018 सालात भारतासमोर खडतरं आव्हान असणार आहेत. आगामी वर्षात भारताला बहुतांश सामने हे परदेशात खेळायचे आहेत. यापैकी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला 5 जानेवारीपासून सुरुवात होत आहे.  भारतामध्ये जशा खेळपट्टय़ा असतात तशा निश्चितच दक्षिण आफ्रिकेत मिळणार नाहीत, तेथील खेळपट्टय़ांवर चेंडूला उसळी जास्त मिळते. या दौऱ्यात गोलंदाजीबरोबरच भारतीय फलंदाजांची खरी परीक्षा असणार आहे.  

2017 चा हंगाम भारतीय संघासाठी चांगला गेला असला तरीही भारताच्या यशात विशेष काहीच वाटत नाही. वर्षभरात भारत बहुतांश सामने हे घरच्या मैदानावर खेळला आणि काही अपवाद वगळले तर एकदाही भारताला प्रतिस्पर्धी संघाकडून कडवी टक्कर मिळालेली नाही. त्यामुळे एकतर्फी विजयच पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिका दौ-याची भारताची ही सातवी प्रदक्षिणा असेल. 1992 पासून भारतीय संघाला या भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. 2010-11मध्ये एम.एस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आफ्रिकेत आतापर्यंत सर्वाधिक यश मिळवता आलं असलं तरी तीन सामन्यांची कसोटी मालिका बरोबरीत सुटली होती. याव्यतिरिक्त भारतानं पाच मालिका गमावल्या आहेत.  

टॅग्स :मोहम्मद शामीसोशल मीडिया
Open in App