Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 

...अशा प्रकारे मोहम्मद शमीला सात वर्षांचे ३ कोटी ३६ लाख रुपयेही द्यावे लागतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 01:08 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला घटस्फोट प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची पत्नी हसीन जहाँ आणि मुलगी आयरा यांना दरमहा ४ लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. शमी आणि हसीन जहाँ हे बऱ्याच काळापासून वेगळे राहतात. न्यायालयाचा निर्णय सात वर्षांपूर्वीपासून लागू असणार आहे. शमीला ही रक्कम देखभाल खर्च अथवा पोटगी म्हणून द्यावी लागेल. यानुसार त्याला दरमहा पत्नीला १.५ लाख रुपये तर मुलीला २.५ लाख रुपये द्यावे लागतील.

न्यायाधीश अजय कुमार मुखर्जी यांच्या खंडपीठाने हसीन जहाँच्या याचिकेवर मंगळवारी हा आदेश दिला आणि भारतीय क्रिकेटपटूला दरमहा देखभाल देण्याचे निर्देश दिले आहेत. "माझ्या मते, याचिकाकर्ता क्रमांक १ (पत्नी) ला दरमहा १.५ लाख रुपये आणि त्यांच्या मुलीला दरमहा २.५ लाख रुपये देणे दोघांच्याही आर्थिक स्थिरतेसाठी योग्य ठरेल. शमी त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी अथवा इतर काही खर्चासाठी निर्धारित रकमेव्यतिरिक्त अधिक काही स्वेच्छेने देऊ इच्छित असेल तर, त्यासाठी तो स्वतंत्र आहे," असे न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, शमीला त्याची पत्नी हसीन जहाँला, दरमहा १.५ लाख रुपयांप्रमाणे सात वर्षांचे १ कोटी २६ लाख रुपयेही द्यावे लागतील. तर, मुलगी आयरालाही  २.५ लाख रुपये महिन्याच्या हिशेबाने, २ कोटी १० लाख रुपये द्यावे लागतील. अशा प्रकारे मोहम्मद शमीला सात वर्षांचे ३ कोटी ३६ लाख रुपये द्यावे लागतील. 

टॅग्स :मोहम्मद शामीभारतीय क्रिकेट संघउच्च न्यायालयन्यायालय