टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या रणजी ट्रॉफीमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांत एकूण १५ विकेट्स घेऊन निवडकर्त्यांना त्याची फिटनेस दाखवून दिली. मात्र, या कामगिरीसोबतच मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि शमी यांच्यातील कथित तणावाचे वृत्तही चर्चेत आले. आता बीसीसीआयच्या हस्तक्षेपानंतर हा वाद थंडावल्याचे संकेत मिळत आहेत.
काही आठवड्यांपूर्वी, वेस्ट इंडिज मालिकेसाठी निवड न झाल्यानंतर शमीने सांगितले होते की, तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. परंतु त्याला बीसीसीआय किंवा निवडकर्त्यांकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. तो असेही म्हणाला, "अपडेट्स देणे किंवा घेणे हे माझे काम नाही. माझे काम एनसीएमध्ये जाणे, तयारी करणे आणि सामने खेळणे आहे. अपडेट्स कोण देईल किंवा नाही, हे त्याचे प्रोफेशन आहे." यावर उत्तर देताना अजित आगरकर यांनी स्पष्ट केले होते की, शमीशी बोलणे झाले आहे. परंतु, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाला तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पूर्णपणे तयार असल्याचे वाटत नाही.
बीसीसीआयचा हस्तक्षेप आणि आरपी सिंगची भेट
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बीसीसीआयने हस्तक्षेप केला. बोर्डाने आपले नवीन मध्यवर्ती क्षेत्र निवडक आरपी सिंगला या प्रकरणाकडे लक्ष देण्यासाठी पाठवले. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर बंगाल विरुद्ध गुजरात रणजी सामन्यादरम्यान आरपी सिंग हा शमीशी बोलताना दिसले.
शमी काय म्हणाला?
गुजरातविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शमीने ८ विकेट्स घेतले. या धडाकेबाज कामगिरीनंतरही त्याने कोणतेही वादग्रस्त विधान करणे टाळले. संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर तो मिश्किलपणे म्हणाला की, "मी नेहमीच वादात असतो. मीडियाने मला असा गोलंदाज बनवले आहे की, मी बोललो तर वाद होईल. आता मी काय बोलू शकत नाही,सोशल मीडियावर कोणीही काहीही बोलू शकते."
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत निवड होण्याची शक्यता
शमीचा सध्याचा फॉर्म पाहता, १४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत त्याचा संघात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. आरपी सिंग यांच्या हस्तक्षेपामुळे आता हा तणाव कमी होऊन खेळाडू आणि निवडकर्ते यांच्यात समन्वय साधला गेला असल्याचे दिसून येत आहे.