Join us

"भूक असेल तर..." इंग्लंड विरुद्ध मैदानात उतरण्याआधी मोहम्मद शमीची 'डरकाळी'

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून तो कमबॅक करतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 14:54 IST

Open in App

Mohammed Shami Statement Ahead of IND vs ENG 1st T20I: भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅकसाठी सज्ज झालाय. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्याआधी मोहम्मद शमीनं एक मोठं वक्तव्य केलं आहे. जर देशासाठी खेळण्याची भूक असेल, तर तुम्ही अनेक दुखापतीतून सावरून कमबॅक करू शकता, असे त्याने म्हटले आहे.

 लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

१४ महिन्यांनी कमबॅक करतोय शमी

मोहम्मद शमी २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचा सामना खेळला होता. दुखापतीमुळे टीम इंडियातून आउट झाल्यावर १४ महिन्यांनी तो पुन्हा एकदा भारतीय ताफ्यात खेळताना दिसणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीही त्याची संघात निवड झाली आहे. त्यामुळे तो कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.

भूक हवी, मग... नेमकं काय म्हणाला शमी?

इंग्लंड विरुद्धचा टी-२० सामना कोलकाताच्या मैदानात रंगणार आहे. या सामन्याआधी मोहम्मद शमीनं बंगाल क्रिकेट असोसिशनच्या एका कार्यक्रमात सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तो म्हणाला की, "देशासाठी खेळण्याची भूक अशी असावी जी कधीच संपणार नाही. जर ती भूक असेल तर तुम्ही पुन्हा संघर्षाचा लढा देऊन पुन्हा उभे राहू शकाल. भारतीय संघाकडून कितीही खेळतो तरी ते कमीच वाटते. कारण एकदा काही मी क्रिकेट सोडलं तर पुन्हा मला देशाकडून खेळण्याची संधी कधीच मिळणार नाही, या आशयाच्या  शब्दांत त्याने कमबॅकसाठी आतुर असल्याचे बोलून दाखवले.  

दुखापत झाल्यावर मनात काय विचार येतो?

कोणताही क्रिकेटर दुखापत झाल्यावर क्रिकेट सोडण्याचा विचार करत नाही. दुखापत झाल्यावर प्रत्येकजण यातून सावरून पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी प्रयत्नशील असतो. माझ्याही डोक्यात कधी कमबॅक करणार हाच विचार होतो, असेही त्याने यावेळी बोलून दाखवले. 

शमीशिवाय गांगुली अन् मिताली राज यांनीही लावली होती हजेरी

१५ वर्षाखालील महिला क्रिकेट संघाच्या कौतुक सोहळा समारंभाला मोहम्मद शमीशिवाय भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली,  भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज यांचीही उपस्थिती होती. यावेळी शमीनं बंगाल क्रिकेटचेही आभार मानले. मी उत्तर प्रदेशमध्ये जन्मलो असलो तरी बंगालनं मला घडवलं. हेच माझं घरं अन् माझं आयुष्य आहे, अशा शब्दांत त्याने बंगाल क्रिकेट असोसिएशनचेही आभार मानले. टीम इंडियात कमबॅक करण्याआधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो बंगालच्या संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. 

 

टॅग्स :मोहम्मद शामीभारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघ