CEAT cricket awards 2024 : वन डे विश्वचषक २०२३ मध्ये प्रतिस्पर्धी संघांसाठी काळ ठरलेला भारतीय गोलंदाज म्हणजे मोहम्मद शमी. सुरुवातीला संधीच्या शोधात असलेल्या शमीने संधी मिळताच त्याचे सोने केले. विश्वचषकात भारताला अपराजित अंतिम फेरीत पोहोचवण्यात शमीचा मोठा हात आहे. भारताला किताब जिंकता आला नसला तरी शमीने स्पर्धेत सर्वाधिक बळी घेऊन तमाम भारतीयांचे मन जिंकले. याचेच बक्षीस म्हणून त्याला तेव्हापासून अनेक पुरस्कार मिळत आहेत. बुधवारी या यादीत भर पडली असून, CEAT cricket awards 2024 मध्ये भारतीय गोलंदाजाला वन डे बॉलर ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले.
यावेळी बोलताना शमीने त्याच्या शैलीत भारी भाषण केले. मिश्किल टिप्पणी आणि कर्णधार रोहित शर्माला मारलेला टोमणा सर्वांचे लक्ष वेधून गेला. तो म्हणाला की, मला उशीरा संधी मिळते याची आता सवयच झाली आहे. मागील विश्वचषकात देखील तेच झाले. पण, सुदैवाने मी चांगली कामगिरी केली. जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी संघासाठी माझे बेस्ट देऊ शकलो याचा आनंद आहे. मला संधी मिळाली तरच मी काहीतरी करून दाखवू शकतो. केवळ बाकावर बसवले तर फक्त सहकारी खेळाडूंना पाणी देऊ शकतो. पण, जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी कर्णधाराला निराश केले नाही. त्यामुळेच व्यवस्थापनानेही मला पुन्हा बाकावर बसवण्याचा विचारही केला नाही. शमीने हे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
दरम्यान, क्रिकेट विश्वातील कलावंत आणि मागील वर्षभरात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा बुधवारी मुंबईत पुरस्कार सोहळा पार पडला. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड, रोहित शर्मापासून ते जय शाह यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. बीसीसीआय सचिव जय शाह यांना प्रशासन अन् कारभार उत्कृष्टरित्या सांभाळल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. माजी खेळाडू सुनिल गावस्कर, संजय बांगर, मॅथ्यू हेडन आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलारही उपस्थित होते.
पुरस्काराचे मानकरी
CEAT जीवनगौरव पुरस्कार - राहुल द्रविड
पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर - रोहित शर्मा
वन डे बॅट्समन ऑफ द इयर - विराट कोहली
वन डे बॉलर ऑफ द इयर - मोहम्मद शमी
टेस्ट बॅट्समन ऑफ द इयर - यशस्वी जैस्वाल
टेस्ट बॉलर ऑफ द इयर - आर अश्विन
ट्वेंटी-२० बॅट्समन ऑफ द इयर - फिल सॉल्ट
ट्वेंटी-२० बॉलर ऑफ द इयर - टीम साउदी
डॉमेंस्टिक क्रिकेटर ऑफ द इयर - साई किशोर
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर - स्मृती मानधना
महिला बेस्ट बॉलर ऑफ द इयर - दीप्ती शर्मा
स्मृतीचिन्ह - ट्वेंटी-२० इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारी कर्णधार - हरमनप्रीत कौर
IPL साठी लीडरशीर अवॉर्ड - श्रेयस अय्यर
स्मृतीचिन्ह - कसोटीमध्ये सर्वात जलद द्विशतक - शेफाली वर्मा
क्रीडा प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पुरस्कार - जय शाह