ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सध्याच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. सलग दोन सामन्यांमध्ये तो शून्यावर बाद झाल्यामुळे त्याच्या निवृत्तीबद्दलच्या चर्चांना पुन्हा उधाण आले. या पार्श्वभूमीवर, भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विराट कोहलीला एक महत्त्वाचा सल्ला दिला.
एका मुलाखतीत बोलताना कैफ म्हणाला की, "कोहलीने आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी उपकर्णधार श्रेयस अय्यरकडून प्रेरणा घ्यावी आणि भारत 'अ' किंवा स्थानिक क्रिकेटमध्ये खेळून मैदानावर अधिक वेळ घालवावा." कैफच्या मते, "जेव्हा एखादा मोठा खेळाडू त्याची लय गमावतो, तेव्हा त्याला सामन्याच्या सरावाची नितांत आवश्यकता असते. श्रेयस अय्यरने दुखापतीतून परतल्यानंतर रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळून कमबॅक केल."
कैफ पुढे म्हणाला की, "मी नुकताच श्रेयसला भेटलो आणि त्याला त्याच्या भूमिकेबद्दल आणि लयीबद्दल विचारले. तो सध्या फक्त एकदिवसीय खेळत असून रेड-बॉल आणि टी-२० क्रिकेटमधून ब्रेकवर आहे, तरीही इतक्या सहजपणे फलंदाजी कशी करतो? हे मला जाणून घ्यायचे होते.यावर अय्यरने उत्तर दिले की, तो मानसिकदृष्ट्या फीट आहे आणि त्याला आपला खेळ आतून आणि बाहेरून चांगला माहीत आहे."
"अय्यरने इंडिया 'अ' सामने देखील खेळले आहेत आणि म्हणूनच मी म्हणतो की, विराट आणि रोहितनेही असेच करण्याचा विचार करावा. विराट सध्या अस्वस्थ दिसत आहे, तर अय्यर सातत्याने खेळत आहे आणि हे त्याच्या खेळातून स्पष्टपणे दिसून येते", असेही कैफ म्हणाला. दरम्यान, स्थानिक क्रिकेट खेळून फॉर्म आणि आत्मविश्वास परत मिळवण्याचा हा सल्ला कोहलीसाठी आगामी महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी अत्यंत मोलाचा ठरू शकतो.