टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७६ धावांनी मोठा पराभव केल्यानंतर, पाकिस्तानात जणू सण साजरा केला जात असल्याचे चित्र दिसत आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने एका टीव्ही शोमध्ये भारतीय संघाच्या पराभवाचा ज्या प्रकारे आनंद साजरा केला आणि थट्टा उडवली, त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये प्रचंड संताप आहे.
पाकिस्तानातील प्रसिद्ध शो 'हसना मना है' मध्ये मोहम्मद आमिर पाहुणा म्हणून उपस्थित होता. भारताच्या पराभवानंतर या शोचा अँकर ओरडून म्हणाला की, "न इश्क में, न प्यार में, जो मजा है इंडिया की हार में!" यानंतर आमिर स्वतःला रोखू शकला नाही आणि कपाळावर हात ठेवून खदखदून हसत राहिला.
कार्यक्रमादरम्यान अँकरने आमिरची ओळख एक ज्योतिषी म्हणून करून दिली. आमिरने वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरत असल्याचे अँकरने सांगितले. आमिरने आधीच म्हटले होते की अभिषेक शर्मा टी-२० विश्वचषकात फ्लॉप ठरेल. त्यानंतर त्याने भारत सेमीफायन गाठणार नाही, अशी भविष्यवाणी केली, तोच भारताने द.आफ्रिकेविरुद्धचा सुपर ८ मधील पहिला सामना गमावला.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ७ गड्यांच्या मोबदल्यात १८७ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. शिवम दुबेने सर्वाधिक ४२ धावा केल्या, मात्र इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. अवघ्या १११ धावांवर भारतीय संघ गारद झाला आणि ७६ धावांनी सामना गमावला. या पराभवामुळे टीम इंडियाच्या उपांत्य फेरीत गाठणे अवघड झाले आहे. आता भारताला केवळ उर्वरित दोन सामन्यात (झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध) विजय मिळवायचे नाही. तर, ते मोठ्या धावसंख्येच्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.