MLC 2023 : लॉस एंजेलिस नाइट रायडर्स आणि सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स यांच्यातल्या मेजर लीग क्रिकेट (MLC) च्या आठव्या सामन्यात आंद्रे रसेलने १०८ मीटर लांब षटकार मारला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हॅरिस रौफला मारलेले षटकार आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. त्याच रौफला MLC मध्ये आंद्रे रसेलने आसमान दाखवले. १९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आंद्रे रसेलने खाली वाकून हॅरिस रौफची स्लोअर-लेन्थ चेंडू स्टेडियमच्या बाहेरील पार्किंगमध्ये पाठवला.
रसेलने फलंदाजी करूनही नाइट रायडर्सने २१ धावांनी सामना गमावला. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू २६ चेंडूत ४२ धावा करत नाबाद राहिला, त्याने २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ही खेळी केली. सुनील नरिनने १७ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने नाबाद २८ धावांची खेळी केली. २१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नाइट रायडर्स संघाने २० षटकांत ५ बाद १९१ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिस यांनी दमदार फटकेबाजी केली. वेडने ४१ चेंडूत सात चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ७८ धावा केल्या तर स्टॉइनिसने १८ चेंडूत तीन षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. कोरी अँडरसनने २० चेंडूंत ३९ धावा चोपून युनिकॉर्न्सला २० षटकांत ७ बाद २१२ धावा उभ्या करून दिल्या.