कतुनायके (श्रीलंका) : कर्णधार मिताली राजने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करूनही भारताला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले. मितालीने नाबाद १२५ धावा केल्या. भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली आहे.
तिसºया शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करीत पाच बाद २५३ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्ज शून्यावर बाद झाल्यानंतर मिताली व स्मृती मानधनाने डाव सावरला. दोघींनी दुसºया गड्यासाठी १०२ धावांची भागीदारी केली. मितालीने आपल्या कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले. तिने १४३ चेंडूंत १४ चौकार व एक षटकाराच्या साह्याने नाबाद १२५ धावा केल्या. मानधनाने ५१ धावांची खेळी केली.
श्रीलंकेची कर्णधार चामरी अटापट्टू (११५) व सलामीची फलंदाज हसिनी परेरा (४५) यांनी १०१ धावांची भागीदारी करीत विजयाचा पाया रचला. या दोघी बाद झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेवर दबाव आणला. मात्र, कविशा दिलहारीने संयम दाखवत एक चेंडू राखत विजय साकारला.
श्रीलंकेला शेवटच्या षटकात सहा धावांची गरज होती. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आलेल्या कविशाने दीप्ती शर्माच्या चेंडूवर चौकार मारत विजय साकारला. भारताकडून झूलन गोस्वामी व मानसी जोशी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
भारत आणि श्रीलंकेदरम्यान पाच टी-२० सामन्याच्या मालिकेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे.