Mitchell Starc, Most 5+ Wicket Hauls For Left Arm Pacers At Home In Tests: अॅशेस मालिकेतील पर्थच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मिचेल स्टार्कनं अक्षरश: कहर केला. त्याच्या भेदक माऱ्यासमोर कर्णधार बेन स्टोक्ससह इंग्लंडच्या स्टार फलंदाजांनी गुडघे टेकले. स्टार्कनं ५८ धावांत ७ विकेट्सचा डाव साधत या सामन्यात कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी नोंदवली. त्याच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या १७२ धावांत आटोपला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्टार्कचा विश्वविक्रम, या दोन दिग्गजांना टाकले मागे
पर्थच्या मैदानातील कामगिरीसह मिचेल स्टार्कनं अनेक विक्रम मोडीत काढताना नवा विश्व रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. घरच्या मैदानातील कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा पाच विकेट्स हॉल घेणारा तो नंबर वन डावखुरा गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज एलन डेविडसन आणि पाकिस्तानचा माजी जलगदती गोलंदाज वसीम अक्रमला मागे टाकत त्याने नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे.
घरच्या मैदानातील कसोटीत नवव्यांदा मारला 'पंजा'
डेविडसन आणि वसीम अक्रम या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजांनी घरच्या मैदानातील कसोटी सामन्यात प्रत्येकी ८-८ वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. पर्थच्या मैदानत ७ विकेट्स घेत स्टार्कने या दोन दिग्गजांना धोबीपछाड दिली. स्टार्कनं ९ व्या वेळी घरच्या मैदानात पाच विकेट्सचा डाव साधला आहे.
घरच्या मैदानातील कसोटीत सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणारे आघाडीचे ४ डावखुरे गोलंदाज
- ९ - मिचेल स्टार्क - ऑस्ट्रेलिया
- ८ - एलन डेविडसन - ऑस्ट्रेलिया
- ८ - वसीम अक्रम - पाकिस्तान
- ७ - मिचेल जॉनसन - ऑस्ट्रेलिया
इंग्लंडविरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्यात स्टार्कनं १२.५ षटकात ४.५१ च्या इकोनॉमीसह ५८ धावा खर्च करत ७ विकेट्स घेतल्या. याआधी ६ धावांत ६ विकेट ही त्याची सर्वोच्च कामगिरी होती.