वेलिंग्टन : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघाने दुखापतग्रस्त डेवॉन कॉनवेच्या जागी डेरील मिशेलचा संघात समावेश केला आहे.  उपांत्य फेरीच्या सामन्यात कॉनवेला हाताला दुखापत झाली  होती. स्कॅननंतर त्याच्या हाताला फॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले होते. यामुळेच त्याला  भारताविरुद्धच्या मालिकेतून मुकावे लागणार आहे. 
टी-२० विश्वचषकातील उपांत्य सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरलेल्या डॅरेल मिशलची त्याच्या जागी झालेली निवड न्यूझीलंड संघाचा उत्साह वाढवणारी ठरू शकते. याबाबत बोलताना न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, आमच्या संघासाठी ही खूप निराशाजनक बातमी आहे की कॉनवे भारताविरुद्धच्या  स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. मात्र, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी नवीन खेळाडूकडे ही चांगली संधी आहे. कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्याची मिशेलची हातोटी संघासाठी उपयुक्त ठरणार आहे.    तो सध्या आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला आहे. मिशेलने हे सिद्ध केले आहे की तो                  कसोटीमध्येही संघासाठी मोलाचे योगदान देऊ शकतो. जयपूर येथे १७ नोव्हेबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ सोमवारी भारतात दाखल होणार आहे. तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेनंतर २५ नोव्हेंबरपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल.