Join us  

GT vs MI: अहमदाबादमध्ये प्रेक्षकांनी पातळी ओलांडली, हार्दिकची खिल्ली उडवली, नाना Video Viral

MI vs GT IPL 2024: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 7:04 PM

Open in App

Hardik Pandya | अहमदाबाद: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात पार पडला. हा सामना विविध कारणांनी महत्त्वाचा ठरला. मुंबई इंडियन्स प्रथमच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात दिसली, तर शुबमन गिलने पहिल्यांदाच नेतृत्व सांभाळले. गुजरातने ६ धावांनी विजय मिळवला असला तरी संपूर्ण सामन्यात केवळ नकोसा थरार अनुभवायला मिळाला. (Hardik Pandya Troll) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईचा विद्यमान कर्णधार आणि माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma vs Hardik Pandya) असे वातावरण तयार करण्यात आले होते. चाहत्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल करण्याची एकही संधी सोडली नाही, याच्या अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हार्दिकची घरवापसी झाल्यापासून त्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासातील एक यशस्वी कर्णधार असून त्याला अचानक वगळल्याने मुंबईच्या फ्रँचायझीवर देखील टीका होत आहेत. चाहत्यांमध्ये असलेला रोष रविवारी दिसून आला. हार्दिक नाणेफेकीवेळी मैदानात जाताच प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममधून 'रोहित रोहित' असा आवाज ऐकू आला.

प्रेक्षकांच्या घोषणाबाजीकडे हार्दिक पांड्याने दुर्लक्ष केले असले तरी उपस्थित ८० हजार जनता आणि विविध माध्यमातून सामना पाहत असलेल्या चाहत्यांनी या संघर्षाचा अनुभव घेतला. रोहित फलंदाजीला आला तेव्हा देखील चाहत्यांनी त्याचा उत्साह वाढवला तर काहींनी हार्दिकविरोधात घोषणाबाजी केली. एक व्हिडीओ असा देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हार्दिक ड्रेसिंग रूममध्ये जात असताना तेथील प्रेक्षकांनी त्याच्या समोर त्याच्याबद्दल अपशब्द वापरले.

गुजरातची विजयी सलामी दरम्यान, रविवारी मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सने ६ धावांनी पराभव केला. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी १९ धावांची गरज होती. स्ट्राईकवर कर्णधार हार्दिक पांड्या होता. पहिल्याच चेंडूवर पांड्याने षटकार आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर चौकार ठोकला आणि सामन्यात रंगत आणली. आता ४ चेंडूत ९ धावांची गरज होती. पण चौथ्या चेंडूवर हार्दिक बाद झाला अन् पुन्हा गुजरातने पुनरागमन केले. मुंबईचा कर्णधार ४ चेंडूत ११ धावा करून तंबूत परतला. ३ चेंडूत ९ धावा हव्या असताना पियुष चावला बाद झाला. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने एक धाव काढली आणि शेवटच्या चेंडूवर देखील एक धाव मिळाली. अशाप्रकारे मुंबईने ६ धावांनी सामना गमावला. यजमान संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १६२ धावा करू शकला आणि सामना ६ धावांनी गमावला. 

टॅग्स :हार्दिक पांड्याऑफ द फिल्डमुंबई इंडियन्सगुजरात टायटन्सनरेंद्र मोदी स्टेडियमट्रोल