इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) स्पर्धेतील १८ व्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या टप्पात जसप्रीत बुमराहशिवायच मैदानात उतरणार आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत संघाच्या गोलंदाजीची प्रमुख धुरा ही ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहरवर असेल. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'एक से बढकर एक' गोलंदाज आहेत. पण सध्याच्या घडीला क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाजाशिवाय मैदानात उतरणं हा संघासाठी एक मोठा धक्काच आहे. त्याची उणीव भरून काढण्याचे मोठे चॅलेंज मुंबई इंडियन्स संघासमोर असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जयवर्धनेला विचारण्यात आला बुमराहसंदर्भातील प्रश्न
यंदाच्या हंगामाच्या मोहिमेला सुरुवात करण्याआधी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि संघाचा प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी या जोडीला बुमराहच्याच्या अनुपस्थितीत निर्माण होणारी पोकळी कशी भरून काढणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर जयवर्धने याने ताफ्यात काय सुरुये ते सांगितले आहे.
तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत, नेमकं काय म्हणाला जयवर्धने
बुमराहसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक जयवर्धने म्हणाला की, "जसप्रीत बुमराह हा सध्या बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. त्याच्यात प्रगती दिसत असून तो लवकरात लवकर संघात सामील होईल, अशी आशा आहे. तो क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत मैदानात उतरणे निश्चितच एक आव्हान असेल. त्याच्या अनुपस्थितीत अन्य खेळाडूसाठी एक संधी निर्माण होईल, असे सांगत त्यांनी बुमराहच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचे संकेत दिले आहेत.
CSK विरुद्धच्या लढतीनं MI करणार आहे यंदाच्या हंगामातील मोहिमेची सुरुवात
मुंबई इंडियन्सचा संघ रविवारी २३ मार्चला चेपॉकच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीनं आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. या सलामीच्या लढतीशिवाय जसप्रीत बुमराह पहिल्या काही लढतींना मुकणार आहे. तो संघाच्या ताफ्यात येत नाही तोपर्यंत मुंबई इंडियन्स कोणता पर्याय आजमावणार? तो डाव यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.