गुवाहाटी : एक छोटे लक्ष्य गाठल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाची नजर आता विश्वकप जिंकण्यावर केंद्रित झाली आहे.
फॉर्मात असलेली स्मृती गेल्या महिन्यात आयसीसी महिला मानांकनामध्ये जगातील अव्वल खेळाडू ठरली होती. सोमवारपासून इंग्लंडविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्याने स्मृतीने आता अव्वल स्थान कायम राखणे आणि विश्वविजेतेपद पटकावण्याचे लक्ष्य असल्याचे म्हटले आहे.
दुखापतग्रस्त हरमनप्रीत कौरच्या स्थानी टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड झालेली स्मृती म्हणाली,‘ज्यावेळी खेळण्यास प्रारंभ करतो त्यावेळी तुम्ही नेहमीच विश्वविजेतेपद पटकावण्याबाबत विचार करता. आयसीसी क्रमवारील अव्वल स्थान पटकावणे अशा वैयक्तिक लक्ष्याचाही समावेश असतो आणि ते गाठणे समाधानकारक आहे, पण मला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. तेथे पोहोचण्यापेक्षा ते टिकविणे महत्त्वाचे आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे विश्वकप जिंकण्याचे लक्ष्य आहे.’
आगामी मालिकेच्या निमित्ताने भारताला पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेपूर्वी संघातील मुख्य खेळाडू निश्चित करण्याची संधी आहे. मालिका जिंकणे मुख्य लक्ष्य असून त्यामुळे नव्या खेळाडूंची ओळख होईल, असेही स्मृती म्हणाली.
आयसीसी महिला टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन आॅस्ट्रेलियात पुढील वर्षी २१ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत होणार आहे. स्मृती म्हणाली की, मी टी-२० विश्वकप स्पर्धेच्या तयारीला प्रारंभ केला आहे. पुढील सहा ते आठ महिन्यात संघाच्या संयोजनाबाबत बरेच काही निश्चित होईल. मी व रमण सरांनी याबाबत चर्चा केली आहे. न्यूझीलंड दौºयात ज्या उणिवा आम्हाला भासल्या त्या दूर करण्याचा प्रयत्न राहील.