Jos Buttler on Concussion Sub Controversy, Ind vs Eng 4th T20 : इंग्लंड विरूद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात भारताने धमाकेदार विजय मिळवला. भारताकडून शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी अर्धशतके ठोकत संघाला १८१ धावा करून दिल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १६६ धावांतच आटोपला. रवी बिश्नोई आणि हर्षित राणा या दोघांनी ३-३ बळी घेतले. महत्त्वाची बाब म्हणजे हर्षित राणा सामन्याच्या सुरुवातीला संघात नव्हता. सामन्याच्या मध्यांतरात शिवम दुबेला डोक्याला दुखापत झाल्याने बाहेर बसवण्यात आले आणि त्याच्या जागी हर्षित राणाला संघात घेतले गेले. या समावेश कन्कशन-सब या नियमांतर्गत करण्यात आला. पण आता यावरून वाद होऊ लागले आहेत. इंग्लंडचा जोस बटलर याने याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत टोला लगावला.
पुढच्या मॅचला आम्ही १२ खेळाडू उतरवू...
"कदाचित शिवम दुबेने २५ किमी जास्त वेगाने टाकायला सुरुवात केलीय किंवा हर्षित राणाची बॅटिंग खूपच सुधारलीय. हा पर्यायी खेळाडूचा निर्णय अयोग्य होता. आम्हाला हे मान्य नाही. पण हा खेळाचा नियम आहे त्यामुळे आम्हाला ते मान्य करून घ्यावे लागले. आम्ही ही टी२० जिंकू शकलो असतो की नाही ते माहिती नाही पण जे घडलं ते आम्हाला मान्य नाही हे खरं आहे. आता पुढच्या वेळी कदाचित आम्ही टॉसच्या वेळी १२ खेळाडूंचा संघ जाहीर करूया," अशा शब्दांत जोस बटलरने टीम इंडियाच्या निर्णयावर टोला लगावत नाराजी व्यक्त केली.
कन्कशन-सबच्या खेळाडूला मंजुरी कोण देतं?
भारतीय फलंदाजीच्या वेळी शेवटच्या षटकात शिवम दुबेच्या हेल्मेटला चेंडू लागला. त्यानंतर फिजीओने त्याला दोन चेंडू खेळायची परवानगी दिली. पण नंतर त्याला फिल्डिंगसाठी तो फिट नसल्याचे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत कन्कशन सब या निमयांतर्गत भारताकडून शिवम दुबेसारखेच गुणधर्म असलेला खेळाडू देणे आवश्यक होते. भारताने हर्षित राणाचे नाव पुढे गेले. महत्त्वाची बाब म्हणजे, कन्कशन सब म्हणून कोणत्या खेळाडूला मंजुरी द्यायची हे अधिकार कुठल्याही संघाला नसतात. संघ केवळ नाव पुढे करू शकते, त्या खेळाडूला मंजुरी द्यायची की नाही याचा निर्णय सामनाधिकारी म्हणजेच मॅच रेफरी घेतात. त्यानुसार भारतीय संघाने हर्षित राणाचे नाव पुढे केले. सामन्याचे रेफरी असलेले भारताचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ याने या पर्यायी खेळाडूला मंजुरी दिली. असे निर्णय घेण्याचे अधिकार सामनाधिकाऱ्याचेच असतात. त्यानुसारच हा निर्णयही घेतला गेला.