Matthew Brownlee, oldest debutant in cricket history: क्रिकेट हा खेळ प्रतिभेचा आहे, तसाच फिटनेसचाही आहे. मैदानावर फिल्डिंग करताना असो किंवा पिचवर धावा घेताना असो, फिटनेस खूप आवश्यक असतो. त्यामुळे चाळीशीनंतर स्पर्धात्मक क्रिकेट खेळणारे खेळाडू फारच कमी असतात. पण कधीकधी वय जास्त असलेले खेळाडूही आपल्या कामगिरीने संघात स्थान मिळवतात. अशाच एका खेळाडूची सध्या चर्चा रंगली आहे. मॅथ्यू ब्राउनली याने वयाच्या ६२व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत विश्वविक्रम ( World Record ) केला आहे.
६२व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात
एका नवीन संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला आहे. हा संघ आहे फॉकलंड आयलँड. या संघाने नुकताच कोस्टा रिकाच्या दौऱ्यावर ( Falkland Islands vs Costa Rica ) पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. हा टी२० सामना होता. १० मार्च २०२५ रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फॉकलंड आयलँड हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा १०६ वा संघ ठरला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या संघाने पहिल्या सामन्यात प्लेइंग ११ मध्ये खेळवलेले सर्व खेळाडू हे ३१ वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. त्यात सर्वात वयस्कर खेळाडू मॅथ्यू ब्राउनली होता.
मॅथ्यू ब्राउनलीने वयाच्या ६२ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून इतिहास रचला. तो पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात वयस्कर पदार्पण करणारा खेळाडू ठरला. एवढेच नाही तर, ब्राउनली वयाच्या ६० व्या वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा पहिला खेळाडूही ठरला. मॅथ्यू ब्राउनलीने या दौऱ्यात एकूण ३ टी-२० सामने खेळले. या काळात, १० व्या क्रमांकावर फलंदाजी करताना, त्याने पहिल्या सामन्यात १ धाव, दुसऱ्या सामन्यात नाबाद २ धावा आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद ३ धावा केल्या. गोलंदाजीत त्याने एक षटकही टाकले. पण तो विकेट घेऊ शकला नाही.
फॉकलंड आयलँडने कोस्टा रिका दौऱ्यावर एकूण ६ सामने खेळले. त्यापैकी १ सामना त्यांनी जिंकला तर पाच सामने कोस्टा रिकाने जिंकले. फॉकलंड आयलँडने जिंकलेल्या एकमेव सामन्यात मॅथ्यू ब्राउनली प्लेइंग ११ चा भाग नव्हता.
Web Title: Matthew Brownlee become the oldest debutant in cricket history at age 62 years Falkland Islands vs Costa Rica
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.