Join us

Marnus Labuschagne, AUS vs WI: ३ डावांत चोपल्या ४७१ धावा... मार्नस लाबूशेनने मोडला वीरेंद्र सेहवागचा विक्रम

लाबूशेनने तुफान फटकेबाजी करत ओलांडला मोठा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 16:44 IST

Open in App

Marnus Labuschagne, AUS vs WI: ऑस्ट्रेलियात कसोटी सामना असेल आणि मार्नस लाबूशेन संघात असेल तर खूप धावा होतात असे गेल्या काही महिन्यांपासूनचे समीकरणच बनले आहे. पर्थ कसोटीत द्विशतक आणि शतक झळकावणाऱ्या या खेळाडूला ए़डिलेडमध्येही शतक झळकावण्यात यश आले. एडिलेड कसोटीच्या पहिल्या डावात लाबूशेनने १६३ धावा केल्या. या खेळीसह त्याने एक मोठा टप्पा गाठला. लाबूशेनने आपल्या शतकी खेळीच्या जोरावर ३००० कसोटी धावा पूर्ण केल्या. त्याने केवळ ५१ डावात हा टप्पा ओलांडला. सर्वात वेगवान ३ हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत लाबूशेन दुसऱ्या स्थानावर आहे.

लाबूशेनने मोडला वीरेंद्र सेहवागचा विक्रम

डॉन ब्रॅडमन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३ हजार धावा केल्या. त्याने अवघ्या ३३ डावांत ही कामगिरी केली. लाबूशेनच्या आधी वेस्ट इंडिजचा महान फलंदाज एव्हर्टन वीक्सन यानेही ५१ डावांत ३००० कसोटी धावा पूर्ण केल्या. ब्रायन लारा आणि सुक्लिफ यांनी ५२ डावात ३ हजार कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. विव्ह रिचर्ड्सने ५४ डावांमध्ये ही कामगिरी केली. वीरेंद्र सेहवागने भारतासाठी सर्वात जलद ३ हजार कसोटी धावा केल्या होत्या. त्याने केवळ ५५ डावात हा आकडा गाठला.

३ कसोटी डावांत ४७१ धावा

मार्नस लाबूशेन याने ३ डावांत तब्बल ४७१ धावा चोपल्या. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात मार्नस लाबूशेनने तुफान फटकेबाजी केली. त्याने द्विशतकी खेळी (२०४) केली आणि सामन्यात ऑस्ट्रेलियाला आघाडीवर नेले. त्यानंतर पुढच्याच डावात त्याने दमदार शतक झळकावले. १०४ धावांच्या खेळीच्या जोरावर त्याने ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. त्याने तोच फॉर्म दुसऱ्या कसोटीतही कायम ठेवला. त्याने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात दीडशतक ठोकले. १४ चौकारांच्या साथीने त्याने १६३ धावांची खेळी केली.

टॅग्स :विरेंद्र सेहवागआॅस्ट्रेलियावेस्ट इंडिज
Open in App