Ayush Mhatre Vaibhav Suryvanshi, Indian Cricket: भारतीय क्रिकेटमध्ये षटकार मारण्याच्या बाबतीत आजकाल सारेच आघाडीवर आहेत. गेल्या काही महिन्यांत नव्या पिढीतील वैभव सूर्यवंशीने षटकारांचा नवा इतिहास रचला आहे. पण, आता वैभव सूर्यवंशीलाही मागे टाकणारा नवा भिडू तयार झाला आहे. या नवा भिडू म्हणजेच मराठमोळा क्रिकेटर आणि टीम इंडियाच्या अंडर १९ संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे. त्याने वैभव सूर्यवंशीपेक्षा २ जास्त षटकार मारून एक नवीन विक्रम रचला आहे. तसेच, आयुष म्हात्रे १९ वर्षांखालील कसोटी सामन्यात २०० पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव भारतीय कर्णधारही बनला आहे.
आयुष म्हात्रेचा अद्भुत विक्रम
रेड बॉल क्रिकेट म्हणजेच कसोटी क्रिकेटमध्ये आयुष म्हात्रे हा मराठमोळा फलंदाज १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये आघाडीचा भारतीय फलंदाज म्हणून उदयास येत असल्याचे दिसून येते. इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत आयुष म्हात्रे सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. आयुष म्हात्रेने इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध खेळलेल्या २ युवा कसोटी सामन्यात एकूण ९ षटकार मारले. त्यापैकी ६ षटकार त्याने एकाच डावात मारले. ९ षटकारांसह, तो युवा कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू बनला. त्याच्या आधी हा विक्रम सौरभ तिवारीच्या नावावर होता. त्याने २००७-०८ मध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेत ८ षटकार मारले होते.
वैभव सूर्यवंशीपेक्षा २ षटकार जास्त, केला विक्रम
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या ४ सामन्यांच्या युवा कसोटी मालिकेत वैभव सूर्यवंशीने ७ षटकार मारले होते. पण वैभवला सौरभ तिवारीचा विक्रम मोडता आला नव्हता. आयुष म्हात्रेने मात्र वैभव सूर्यवंशीपेक्षा २ षटकार जास्त मारले आणि सौरभ तिवारीचा विक्रमच मोडला.
सर्वाधिक धावा करणारा कर्णधार
इंग्लंडविरुद्धच्या युवा कसोटी मालिकेत, आयुष म्हात्रेने सर्वाधिक षटकार मारण्यात यश मिळवले. तसेच, तो कर्णधार म्हणून युवा कसोटी मालिकेतील एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करणारा कर्णधारही बनला. १८ वर्षीय आयुष म्हात्रेने दुसऱ्या युवा कसोटीत पहिल्या डावात ८० आणि दुसऱ्या डावात १२६ धावा करून एकूण २०६ धावा केल्या. आयुष म्हात्रेने १९ वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला.