Join us  

IPL 2020, KKR vs KXIP: वडिलांच्या इच्छेप्रमाणे खेळू शकलो याचाच आनंद; पंजाबचा सलामीवीर झाला भावूक

IPL 2020, KKR vs KXIP Mandeep Singh : ‘माझे वडिल नेहमी म्हणायचे की, नाबाद खेळी करता आली पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया मनदीपने सामन्यानंतर दिली आणि हे अर्धशतक त्याने आपल्या वडिलांना समर्पित केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 1:47 PM

Open in App

मुंबई : मनदीप सिंगने (Mandeep Singh) सोमवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (Kolkata Knight Riders) सामन्यात किंग्ज ईलेव्हन पंजाबला (Kings XI Punjab) विजयी करताना नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने आपले हे शानदार अर्धशतक वडिलांना समर्पित केले. तीन दिवसांपूर्वीच मनदीपच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र तरीही त्याने आपल्या संघासाठी योगदान दिले. ‘माझे वडिल नेहमी म्हणायचे की, नाबाद खेळी करता आली पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया मनदीपने सामन्यानंतर दिली आणि हे अर्धशतक त्याने आपल्या वडिलांना समर्पित केले.

कोलकाताविरुद्ध अर्धशतक पूर्ण केल्यानंतर भावूक झालेल्या मनदीपने आकाशात बघत फ्लाईंग किस करुन आपल्या वडिलांना मानवंदना दिली. सामन्यानंतर मनदीपने म्हटले की, ‘माझ्यासाठी ही खेळी खूप विशेष आहे. माझे वडिल नेहमी म्हणायचे की, अखेरपर्यंत नाबाद राहता आले पाहिजे. आज मी त्यांच्या इच्छेप्रमाणे खेळलो. आजची माझी खेळी त्यांच्यासाठीच. मी शतक किंवा द्विशतक जरी ठोकले, तरी ते विचारायचे की मी बाद का झालो.’

मनदीपने संथ सुरुवात केल्यानंतर ख्रिस गेलसह आक्रमक पवित्रा घेत कोलकाताला नमवले. आपल्या या आक्रमक खेळीबाबत मनदीप म्हणाला की, ‘वेगाने धावा काढण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मात्र मला ते सहजपणे जमत नव्हते. यानंतर मी कर्णधार लोकेश राहुलशी चर्चा केली आणि नैसर्गिक खेळ करण्याबाबत विचारले. यामुळे मला फिनिशर म्हणून काम करता येऊ शकते असा विश्वास होता. राहुलने मला यासाठी साथ दिली आणि त्याने स्वत: आक्रमणाची धुरा सांभाळली.’ ख्रिस गेलबाबत मनदीप म्हणाला की, ‘मी गेलला म्हटले की, त्याने कधी निवृत्त होऊ नये. तो यूनिव्हर्सल बॉस आहे. त्याचासारखा खेळाडू कोणीच नाही.’

टॅग्स :IPL 2020किंग्स इलेव्हन पंजाबभारतकोलकाता नाईट रायडर्स