लंडन - यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी करण्याच्या इराद्याने आलेल्या अफगाणिस्तानच्या संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. अफगाणिस्तानचा धडाकेबाज सलामीवीर मोहम्मद शहझादला गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागणार आहे. दरम्यान, शहझादच्या जागी इकराम आली खिल याचा अफगाणिस्तानच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
मोहम्मद शहझादचे दुखापतीमुळे संघाबाहेर होणे हे विश्वचषक स्पर्धेत पहिले दोन्ही सामने गमावणाऱ्या अफगाणिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 32 वर्षीय मोहम्मद शहझादने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध झालेल्या लढतींमध्ये मिळून 7 धावा केल्या होत्या. आता उर्वरित सामन्यांसाठी इकराम अली खिल याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात फारशी चमक दाखवू न शकलेल्या अफगाणिस्तानच्या संघाने श्रीलंकेविरुद्ध भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. मात्र फलंदाजांनी निराशा केल्याने एक ऐतिहासिक विजय मिळवण्याची अफगाणिस्तानची संधी हुकली.