भारत विरुद्ध न्यूझीलंड (Ind Vs Nz Second Test) दुसऱ्या कसोटी सामन्याची पहिल्या दिवसापासूनच चर्चा होती. पहिल्या दिवशी पावसाच्या सावटामुळे सामनाच उशिरा सुरू करण्यात आला. त्यानंतर पहिल्या डावात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची विकेट, अशा अनेक कारणांमुळे हा सामना चर्चेचा विषय ठरला. पुन्हा एकदा अम्पायरच्या निर्णयावर नाराज होत विराट कोहलीनं खोचक मैदानावरच खेळादरम्यान खोचक टोला लगावला. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
"काय करतात हे लोक. तुम्ही माझ्या जागी या, मी तुमच्या जागी जातो," असं विराट या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतोय. सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावादरम्यान, न्यूझीलंडचा खेळाडून रॉस टेलर हा फलंदाजी करत होता आणि अक्षर पटेल गोलंदाजी. अक्षरच्या ओवरचा तिसरा बॉल टेलर आणि विकेटकिपर या दोघांना बीट करत चौकाराच्या दिशेने गेला.
परंतु या ठिकाणी अम्पायरनं बाईज न देता ते रन्स फलंदाजाच्या खात्यात जोडले. हा चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागून बाऊन्ड्री लाईनच्या दिशेने जात असल्याचा समज अम्पायरचा झाला. विराट अम्पायरच्या या निर्णयानं नाखुश दिसला. यानंतर त्यानं मजेशीररित्या अम्पायरला टोला लगावला.