Join us

महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविडवर संतापला एस. श्रीसंत, बीसीसीआयवर आरोप लावल्यानंतर श्रीसंत पुन्हा चर्चेत

बीसीसीआयवर आरोप लावल्यानंतर श्रीसंत पुन्हा एकदा मीडियामध्ये चर्चेत आहे. आता त्याने माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनीवर आरोप लावले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 16:43 IST

Open in App

मुंबई - आजीवन क्रिकेट खेळण्यावर बंदी घातल्यामुळे चिडलेल्या एस.श्रीसंतने आपल्या आधीच्या इंटरव्यूमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर(बीसीसीआय) आरोप लावले होते. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात इतर अनेक खेळाडू सहभागी होते जे अजूनही भारतीय टीमचे सदस्य आहेत. बीसीसीआयने या खेळाडूंची मदत केली असं श्रीसंत म्हणाला होता.  बीसीसीआयवर आरोप केल्यानंतर श्रीसंत पुन्हा एकदा मीडियामध्ये चर्चेत आहे. आता त्याने माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनीवर आरोप केले आहेत. करिअरच्या खडतर काळात राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनीने मला पाठिंबा दिला नाही असं श्रीसंत म्हणाला.  रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता. 2013 च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतसह राजस्थान रॉयल्सचे दोन अन्य खेळाडू दोषी आढळले होते. मुलाखतीत श्रीसंत म्हणाला, त्यावेळी राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सला सपोर्ट देण्यासाठी खंबीरपणे उभा होता. द्रविड मला खूप चांगला ओळखत होता, मी कसा आहे हे त्याला माहित होतं तरीही त्याने मला पाठिंबा दिला नाही. ज्या वेळी स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी सुरू होती तेव्हा धोनी माझा कर्णधार होता. तेव्हा मी धोनीला एक भावूक मेसेज पाठवला होता. पण धोनीनेही मला त्याचं उत्तर दिलं नाही, दोघांकडून अशा प्रकारच्या वागणुकीमुळे खूप दुःख झालं असं श्रीसंत मुलाखतीत म्हणाला.श्रीसंतवरील आजीवन बंदी कायम -बीसीसीआयने श्रीसंतवर घातलेली आजीवन क्रिकेटबंदी केरळ हायकोर्टाने कायम ठेवली . 2013 मध्ये झालेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंतवर कारवाई करत बीसीसीआयने आजीवन क्रिकेटबंदी घातली होती. याविरोधात श्रीसंतने हायकोर्टाच्या एकसदस्यीय पीठापुढे आव्हान याचिका दाखल केली होती. त्यावर ७ ऑगस्ट रोजी निकाल देताना श्रीसंतवरील आजीवन बंदी उठवण्यात आली होती. बीसीसीआयने कशी चुकीच्या पद्धतीने ही कारवाई केली, याबाबतही कोर्टाने ताशेरे ओढले होते. दरम्यान, या निर्णयाला बीसीसीआयने मुख्य न्यायाधीश नवनीत प्रसाद सिंग यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे आव्हान दिले होते. यावर दोन दिवस सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने बीसीसीआयच्या बाजूने निर्णय दिला.

टॅग्स :क्रिकेटएस.श्रीसंतमहेंद्रसिंह धोनीराहूल द्रविड