Rishabh Pant Digvesh Rathi Fined, IPL 2025 MI vs LSG: लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने शेवटच्या षटकात मुंबई इंडियन्सचा रोमहर्षक पद्धतीने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मिचेल मार्श आणि एडन मार्करमच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौने २०३ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला केवळ १९१ धावाच करता आल्या. या सामन्यात एक विचित्र गोष्ट दिसली. प्रतिभावान डावखुरा फलंदाज तिलक वर्मा फलंदाजी करत असताना, मोक्याच्या क्षणी मैदानाबाहेर गेला. त्याला रिटायर्ड आऊट करण्यात आले. त्यानंतरही मुंबई संघाला सामना जिंकता आला नाही. दिग्वेश राठीला सामनावीराचा किताब मिळाला. पण सामन्यानंतर कर्णधार रिषभ पंत आणि दिग्वेश दोघांनाही दंड ठोठवण्यात आला.
रिषभ पंतला १२ लाखांचा दंड
मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी विजय मिळवल्यानंतरही लखनौ संघाच्या दोन खेळाडूंना मोठा फटका बसला. सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी लखनौचा कर्णधार रिषभ पंतला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कोणत्याही गोलंदाजी संघाला २० षटके पूर्ण करण्यासाठी ९० मिनिटे निश्चित केलेली वेळ असते. लखनौ संघ निर्धारित वेळेपेक्षा एक षटक मागे होता. त्यामुळे त्याला शेवटच्या षटकात ३० यार्ड बाहेर एक फिल्डर कमी ठेवावा लागला. तसेच पंतला १२ लाखांचा दंड ठोठवण्यात आला. यंदाच्या हंगामात पंतकडून पहिल्यांदाच हा प्रकार घडल्याने त्याला १२ लाखांचा दंड करण्यात आला.
दिग्वेशचे अर्धे मानधन बुडाले
याशिवाय आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याबद्दल लखनौचा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीला सलग दुसऱ्यांदा त्याच्या मॅच फीमधील रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आली. पंजाब किंग्जविरुद्ध विकेट घेतल्यानंतर केलेल्या नोटबूक सेलिब्रेशनसाठी त्याला मानधनाच्या २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागली होती. यावेळी नमन धीरला बाद केल्यानंतर त्याने पुन्हा एकदा तेच केले. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा मानधनाच्या ५० टक्के रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आली. तसेच सलग दुसऱ्यांदा असा प्रकार झाल्याने त्याच्या नावे नव्याने आणखी दोन डिमेरिट पॉइंट जोडले गेले.