Join us

IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?

Lord's Pitch, IND vs ENG 3rd Test News : आजपासून लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवली जाणार तिसरी कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 14:50 IST

Open in App

Lord's Pitch, IND vs ENG 3rd Test : लॉर्ड्स कसोटी सुरू होण्यापूर्वीच मैदानावरी पिचची बरीच चर्चा सुरू आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की लॉर्ड्सची खेळपट्टी कशी असेल? एजबॅस्टनमधील पराभवानंतर अशी बातमी आली होती की इंग्लंड लॉर्ड्सवर वेगवान आणि उसळणारी खेळपट्टी बनवणार आहे. ज्यामुळे गोलंदाजांना खूप मदत होईल. टीम इंडिया लॉर्ड्समध्ये पोहोचली आणि तिथली खेळपट्टीही बरीच हिरवीगार दिसली. पण आता सामन्यापूर्वी दिसणाऱ्या खेळपट्टीची स्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे. लॉर्ड्सच्या खेळपट्टीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो खरोखरच आश्चर्याचा धक्का देणारा आहे.

लॉर्ड्सच्या खेळपट्टीत कोणते बदल झाले?

दोन दिवसांपूर्वी लॉर्ड्सची खेळपट्टी हिरवीगार दिसत होती. त्यावर खूप गवत होते. पण आता या खेळपट्टीवरून गवत काढून टाकण्यात आले आहे. खेळपट्टी पाहता असे दिसते की येथे फलंदाजांना चांगली मदत मिळेल आणि खूप धावा होतील. तसेच, खेळपट्टी काही अंशी वेगवान गोलंदाजांनासह फिरकी गोलंदाजांनाही मदत करेल. इंग्लंडने जाहीर केलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जोफ्रा आर्चरचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक असेल असे वाटत होते. पण त्यासोबतच त्यांनी फिरकीपटू शोएब बशीरचाही इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला असल्याने काहीसा संभ्रम होता.

टीम इंडिया दोन बदल करेल?

लॉर्ड्स कसोटीत टीम इंडियामध्ये खेळाडू बदलाची बातमी आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या जागी बुमराहला संधी मिळेल असे वृत्त आहे पण लॉर्ड्सवरील खेळपट्टी पाहता, टीम इंडिया कुलदीप यादवलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करू शकते, अशी अपेक्षा आहे. कुलदीपला संघात स्थान द्यायचे झाल्यास, नितीश कुमार रेड्डीला बाहेर बसवले जाऊ शकते. किंवा दोन सामन्यात फ्लॉप गेलेल्या करूण नायरलाही संघाबाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५इंग्लंडशुभमन गिलऑफ द फिल्ड