नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्थानिक क्रिकेटपटूंना एक खूशखबर दिली आहे. बीसीसीआयकडून स्थानिक क्रिकेटपटूंच्या सामना शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे स्थानिक क्रिकेटपटूंना सामना खेळल्यानंतर मिळणारे मानधन आता वाढवून दिले जाणार आहे.
जय शहा यांनी सांगितल्यानुसार, ४० पेक्षा जास्त सामने खेळणाऱ्या स्थानिक क्रिकेटपटूंना प्रत्येकी ६० हजार रुपये दिले जातील. म्हणजे खेळाडू एका सामन्यात २ लाख ४० हजार रुपये कमवू शकतील. दुसरीकडे ज्या खेळाडूंनी २१ ते ४० सामने खेळले आहे, त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जाणार आहे. तर यापेक्षा कमी अनुभव असणाऱ्या क्रिकेटपटूंना प्रत्येकी ४० हजार रुपये दिले जातील. या निर्णयाचा फायदा अंडर-१६ गटापर्यंतच्या खेळाडूंना होणार आहे. २३ वर्षांखालील खेळाडूंना प्रत्येकी २५ हजार रुपये दिले जाणार आहे, तर १९ वर्षांखालील खेळाडूंना २० हजार रुपये इतकी रक्कम सामना शुल्काच्या स्वरूपात मिळणार आहे.
कोरोनामुळे २०१९-२० या वर्षातील स्थानिक क्रिकेट सामने रद्द करण्यात आले होते. यात मुख्यत्वेकरून स्थानिक क्रिकेटपटूंचे मोठे नुकसान झाले होते. स्थानिक क्रिकेटलाही याचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे क्रिकेटपटूंना कोरोना काळात रद्द झालेल्या या स्थानिक स्पर्धांची भरपाई म्हणून २०२०-२१ मध्ये सामना शुल्कात ५० टक्के वाढ देण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला आहे.
स्थानिक क्रिकेटपटूंना मिळणारी रक्कम -
वरिष्ठस्तर
४० पेक्षा जास्त सामने ६०,००० रुपये
२१ ते ४० सामने ५०,००० रुपये
२१ पेक्षा कमी सामने ४०,००० रुपये
कनिष्ठस्तर
अंडर-२३ क्रिकेटपटू २५,००० रुपये
अंडर-१९ क्रिकेटपटू २०,००० रुपये
महिला क्रिकेटपटू
प्रत्येकी २०,००० रुपये