दुबई : ‘लसिथ मलिंगाची जागा भरून काढणे सोपे नाही. तो मुंबईसाठी मॅचविनर खेळाडू आहे. जेव्हा कधीही आम्ही अडचणीत असतो, तेव्हा मलिंगा त्यातून संघाला नेहमी बाहेर काढतो. नक्कीच त्याच्या अनुभवाची कमतरता आम्हाला यंदा भासेल,’ असे मत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले.
श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज मलिंगा याने वैयक्तिक कारणाने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली. स्पर्धा इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असलेल्या ३७ वर्षीय मलिंगाचा हा निर्णय गतविजेत्या मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का आहे. आॅनलाइन पत्रकार परिषदेमध्ये रोहित म्हणाला की, ‘मलिंगाची कमतरता नक्कीच भासेल. शिवाय त्याची तुलना कोणत्याच खेळाडूसोबत करता येणार नाही. त्याने मुंबई इंडियन्ससाठी अविश्वसनीय कामगिरी केली आहे.’ त्याच वेळी, रोहितने ‘आमच्याकडे जेम्स पॅटिन्सन, धवल कुलकर्णी, मोहसिन खान हे खेळाडू असून आम्ही मलिंगाच्या जागी यांना खेळवू. मात्र मलिंगाची तुलना कोणाबरोबरही होऊ शकत नाही,’
सलामीलाच खेळणार
रोहित मुंबईच्या डावाची सुरुवात करणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. तो म्हणाला, ‘गेल्या वर्षी मी संपूर्ण स्पर्धेत डावाची सुरुवात केली आणि मी हे कायम ठेवणार आहे. मी काही पर्यायही ठेवले असून संघ व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार कामगिरी करण्यास तयार आहे. भारताकडून खेळताना संघ व्यवस्थापनाकडे सर्व पर्याय उपलब्ध असतात व येथेही अशीच कामगिरी करू.’
सीएसकेविरुद्ध सज्ज! : सलामीला चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध (सीएसके) खेळण्यास आम्ही सज्ज आहोत, असे सांगत रोहित म्हणाला, ‘आम्ही आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहोत. सीएसके यशस्वी संघांपैकी एक असून गाफील राहणार नाही. ते आक्रमक खेळतील. कोणीही अनेक महिन्यांपासून क्रिकेट खेळलेले नसल्याने प्रत्येक जण विजयी सुरुवात करण्यास उत्सुक असेल.’
‘परिस्थितीशी जुळवून घेणे महत्त्वाचे’
रोहित म्हणाला, ‘यूएईमध्ये परिस्थितीनुसार स्वत:ला बदलण्याचे आव्हान आमच्यापुढे आहे. कारण आमच्या संघातील कोणत्याही खेळाडूला अशा वातावरणात खेळण्याची सवय नाही. खेळपट्टीचे स्वरूप समजून घेत त्यानुसार योजना आखाव्या लागतील.’