Join us  

गोलंदाजीत पर्यायांअभावी उणिवा आल्या चव्हाट्यावर; वन डे मालिकेेचे रिपोर्ट कार्ड...

ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिका खिशात घातली. नंतर भारताने तिसरा सामना जिंकून मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. कोरोनामुळे आठ महिन्याच्या ब्रेकनंतर ही पहिली द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिका आहे. तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत टीम इंडियाच्या कामगिरीचा क्रिकेटतज्ज्ञ अयाज मेमन यांनी तयार केलेले हे रिपोर्ट कार्ड...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 2:14 AM

Open in App

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर 

विराट कोहली (७/१०) वन डे मालिकेत शतक न झळकावताही फलंदाजीत सातत्य राखले.गोलंदाजांचा योग्य वापर न केल्याने मात्र टीकेचा सामना करावा लागला. तिसऱ्या वन डेत प्रेरित करीत संघाला विजयी मार्गावर आणले. अजिंक्य रहाणे(४.५/१०) पहिल्या सामन्यात आकर्षक ७६ धावा केल्यानंतर पुढच्या दोन्ही सामन्यात शानदार सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरला. मयंक अग्रवाल (४ /१०) पहिल्या दोन्ही सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. डाव सावरण्याऐवजी फटकेबाजीवर भर दिला. 

श्रेयस अय्यर (२/१०) सीमारेषेवर चांगले क्षेत्ररक्षण केले मात्र फलंदाजीत निराशा झाली. डाव सावररण्यात अपयशी. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर कमालीचे अपयश. लोकेश राहुल (४.५/१०) राहुलला काही प्रगाणात यशस्वी मानले जाईल. दुसऱ्या वन डेतील ७६ धावांचा अपवाद वगळता मालिकेत मोठी खेळी करू शकला नाही.  हार्दिक पांड्या (९/१०) ९० आणि नाबाद ९२ धावा ठोकून फलंदाजीत यशस्वी पुनरागमन केले. संघाची गरज ओळखून फटकेबाजी करण्यात यशस्वी. जखमेतून पूर्णपणे सावरु न शकल्याने अधिक गोलंदाजी करू शकला नाही पण योग्यतेची झलक पहायला मिळाली. रवींद्र जडेजा (७/१०) अपेक्षेनुरुप अधिक गडी बाद करता न आल्याने निराश झाला मात्र फलंदाजीत देखणी कामगिरी केली. तिसऱ्या वनडेत विशेषत: अर्धशतकी खेळी करीत लक्ष वेधले. 

मोहम्मद शमी (४/१०) पहिल्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यात मात्र महागडा ठरला. स्वींग आणि सीम चेंडू टाकण्यात अपयशी.  युजवेंद्र चहल (१/१०) मालिका जिंकून देणारा गोलंदाज असलेला गोलंदाज सध्या अपयशी ठरला. गडी बाद करण्यातही अपयशी आणि चेंडूवर नियंत्रण राखण्यातही कमालीचा अयशस्वी. नवदीप सैनी (१/१०) अनुभवहीन असल्याचे जाणवले. चांगला मारा करण्याचा प्रयत्न केला पण वेग आणि टप्पा यांच्यात अचूकता राखण्यात अपयशी. डेथ ओव्हर्समध्ये फारच खर्चिक ठरला.जसप्रीत बुमराह (४/१०) पहिल्या दोन सामन्यात अडखळत खेळला. बळी न घेता मोठ्या धावा मोजल्या. अखेरच्या सामन्यात यॉर्करच्या बळावर मॅक्सवेल सारख्याला बाद केले. शुभमान गिल (४.५/१०) तिसऱ्या सामन्यात मयांक अग्रवालऐवजी स्थान मिळाले. अप्रतिम फलंदाजीचे दर्शन. याच बळावर टी-२० त खेळण्याची दावेदारी सादर केली. 

शार्दुल ठाकूर (६.५ /१०) तिसऱ्या सामन्यात तीन महत्त्वाचे बळी घेत विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान. कठोर मेहनतीसह स्वींग आणि सीमचा योग्य वापर केला. कुलदीप यादव (३.५ /१०) तिसऱ्या वन डेत चहलसोबत संधी मिळाली. अपेक्षेनुसार उत्कृष्ट गोलंदाजी केली. लौकिकानुसार कौशल्यपूर्ण मारा करण्यात मात्र अपयशी ठरला. टी. नटराजन ( ५ /१०) तिसऱ्या वन डेत शानदार कामगिरीसह यशस्वी पदार्पण केले. काही करुन दाखवण्याचा निर्धार जाणवला. दडपणातही मधल्या षटकात धावा रोखणारी कामगिरी करीत लक्ष वेधले.

टॅग्स :भारतआॅस्ट्रेलिया