Join us

ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या

LA Olympics 2028 Cricket Timetable : २० आणि २८ जुलैला होणार पदकाचे सामने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 16:40 IST

Open in App

LA Olympics 2028 Cricket Timetable : १२८ वर्षांनंतर लॉस एंजेल्समध्ये होणाऱ्या २०२८ च्या ऑलिंपिकमध्ये क्रिकेट या खेळाचे पुनरागमन १२ जुलै रोजी होणार आहे. लॉस एंजेल्सपासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या पोमेना शहरातील फेअरग्राउंड्स स्टेडियमवर क्रिकेटच्या सामन्यांची सुरुवात होणार आहे. ऑलिंपिकमध्ये पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी ६ संघ टी२० स्वरुपाचे क्रिकेट सामने खेळतील. दोन्ही गट मिळून १८० खेळाडू सहभागी होतील. १९०० मध्ये पॅरिस ऑलिंपिकमध्ये यापूर्वी फक्त एकदाच ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स या दोनच संघांनी स्पर्धेत भाग घेतला होता. ग्रेट ब्रिटनने स्पर्धेतील एकमेव सामना जिंकून सुवर्णपदक जिंकले होते.

कसे असेल वेळापत्रक?

स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार, १२ जुलैपासून सामन्यांना सुरुवात होईल. पदकासाठीचे सामने २० आणि २८ जुलैला खेळवले जातील. बहुतेक दिवशी दोन-दोन सामने खेळवले जातील. लॉस एंजल्सच्या स्थानिक वेळेनुसार, हे सामने सकाळी ९ वाजता आणि संध्याकाळी ६.३० वाजता सुरु होतील. म्हणजेच भारतात पहिला सामना रात्री ९.३० वाजता तर दुसरा सामना दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता सुरु होईल. १४ आणि २१ जुलै रोजी कोणतेही सामने होणार नाहीत.

कोणते ६ संघ खेळणार?

यंदा पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी ९० खेळाडूंचा कोटा असेल. १२ स्पर्धक संघ १५ खेळाडूंचा संघ जाहीर करतील. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (IOC) २०२८ च्या ऑलिंपिक खेळांबाबत ही माहिती दिली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोणते ६ संघ पात्र ठरणार याचा निर्णय ICC कडून घेतला जाईल.

भारतीय संघ सुवर्णपदकाचा दावेदार

भारतीय पुरुष आणि महिला संघ दोन्ही प्रकारात सुवर्णपदकाचे दावेदार आहेत. टी२० विश्वचषक विजेत्या पुरुष संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. दुसरीकडे, महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहेत. दोन्ही संघ जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवतात आणि प्रत्येक स्पर्धेत विजेतेपदाचा दावेदार असतात.

टॅग्स :टी-20 क्रिकेटअमेरिका