आशिया कप २०२५ मध्ये टीम इंडियाचे दोन खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीने विरोधी गोलंदाजांना सातत्याने अडचणीत आणत आहे, तर डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आपल्या फिरकीच्या जाळ्यात फलंदाजांना अडकवत आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सुपर-४ सामन्यात कुलदीप यादवने आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मोठी ऐतिहासिक नोंद केली. त्याने चार षटकांत केवळ १८ धावा देत तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे त्याने भारताच्या रवींद्र जडेजालाच नाही, तर श्रीलंकेच्या महान मुथय्या मुरलीधरन यांनाही मागे टाकले आहे.
आशिया कपच्या इतिहासात भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज
कुलदीप यादवने आशिया कप २०२५ मध्ये चेंडूसह आपली क्षमता सिद्ध करून दाखवली. त्याने आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये ८.०८ च्या प्रभावी सरासरीने एकूण १२ विकेट्स घेतल्या आहेत. बांगलादेशविरुद्ध घेतलेल्या तीन विकेट्समुळे तो आशिया कपच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम रवींद्र जडेजाच्या नावावर होता, ज्याने आशिया कपमध्ये २९ विकेट्स घेतल्या होत्या. कुलदीपने आता एकूण ३१ विकेट्स घेत जडेजाला मागे टाकले आहे.
भारताचा आघाडीचा गोलंदाज ठरण्याबरोबरच, कुलदीप यादव आता आशिया कपच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (३० विकेट्स) आणि रवींद्र जडेजा (२९ बळी) यांना मागे टाकले आहे.
आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज (वनडे आणि टी-२० दोन्ही फॉरमॅट):
खेळाडू | देश | विकेट्स |
लसिथ मलिंगा | श्रीलंका | ३३ |
कुलदीप यादव | भारत | ३१ |
मुथय्या मुरलीधरन | श्रीलंका | ३० |
रवींद्र जडेजा | भारत | २९ |
शाकिब अल हसन | बांगलादेश | २८ |
मलिंगाचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी
कुलदीप यादवला २०२५ च्या आशिया कपमध्ये आता आणखी दोन सामने खेळण्याची संधी मिळू शकते. श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याचा आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक ३३ विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. कुलदीप यादवने पुढील दोन सामन्यांमध्ये फक्त तीन विकेट्स घेतल्या, तर तो लसिथ मलिंगाला मागे टाकून आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणून नवीन विक्रम स्थापित करेल.