Join us

कोहलीला समजावून सांगण्याची गरज नाही - द्रविड

कोहली काही वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये होता. यूएईतील आशिया चषक स्पर्धेत त्याला पुन्हा सूर गवसला.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 05:45 IST

Open in App

चटगाव :  क्रिकेटचे जबरदस्त ज्ञान जोपासणाऱ्या विराट कोहलीला काहीही समजावून सांगण्याची गरज नाही. मैदानावर कधी आक्रमक व्हायचे आणि कधी पकड मिळवायची हे त्याला चांगले ठाऊक असल्याचे मत भारतीय संघाचे मुख्य कोच राहुल द्रविड यांनी गुरुवारी व्यक्त केले.  

सरावात विराट किती कठोर मेहनत घेतो, हे पाहून मीदेखील प्रभावित झालो. युवा खेळाडूंनी त्याच्या सरावातून आणि कठोर मेहनतीतून प्रेरणा घ्यायला हवी, असेही द्रविड म्हणाले. कोहली काही वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये होता. यूएईतील आशिया चषक स्पर्धेत त्याला पुन्हा सूर गवसला.  त्याने ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकातही शानदार कामगिरी सुरूच ठेवली. मागच्या आठवड्यात माजी कर्णधार कोहलीने ४४ वे शतक साजरे केले.  

 बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओत द्रविड म्हणाले, ‘आक्रमक कधी व्हायचे आणि खेळावर पकड कधी निर्माण करायची, हे विराटला चांगलेच अवगत आहे.  वन डे क्रिकेटमध्ये विराटचा रेकॉर्ड शानदार आहे.  त्याने जितके सामने जिंकले ते केवळ अप्रतिम असेच होते.  तो फॉर्ममध्ये असो वा नसो त्याची खेळाप्रति असलेली भूक कमी झालेली नाही. युवा खेळाडूंनी त्याच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी.’ विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीत असलेला भारतीय संघ पुढील काही सामन्यात यशस्वी कामगिरीच्या बळावर फायनल नक्की खेळेल, असा विश्वास द्रविड यांनी व्यक्त केला.

टॅग्स :विराट कोहलीराहुल द्रविड
Open in App