Join us

कोहली बनला टीम इंडियाचा ‘मेंटॉर’; सहकाऱ्यांमध्ये जागवली विजयाची प्रेरणा

रोहितने नेटमध्ये नव्या आणि जुन्या चेंडूंवर सराव केला. गाबा मैदानावर सरावाच्या वेळी रोहितने फटक्यांमध्ये सुधारणा केल्याचे जाणवले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 08:04 IST

Open in App

ब्रिस्बेन : विराट कोहली कर्णधार असताना भारतीय संघाच्या सराव सत्रादरम्यान तो आकर्षणाचे केंद्र असायचा. गुरुवारी विराटने सरावादरम्यान आपल्या सहकाऱ्यांना संबोधित केले. ॲडिलेडमध्ये दिवस-रात्र सामना दहा गड्यांनी गमविल्यानंतर महत्त्वपूर्ण अशा तिसऱ्या कसोटीआधी सहकारी खेळाडूंना विजयाची प्रेरणा आवश्यक होती. युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी ‘किंग’ कोहलीपेक्षा उत्कृष्ट मेंटॉर असू शकत नाही. विराट कर्णधार असताना सरावाच्या वेळी सहकाऱ्यांसोबत चांगलाच हितगुज करायचा. नेतृत्व सोडल्यापासून त्याने ही पद्धत बंद केली होती. सलग चार पराभवांमुळे कर्णधार रोहित शर्मावर दडपण आले आहे. अशावेळी  सर्वांत वरिष्ठ खेळाडू या नात्याने शनिवारी सुरू होत असलेल्या सामन्याआधी कोहलीने आज पुढाकार घेतला. उपकर्णधार जसप्रीत बुमराहसह कोहलीने उत्साहवर्धक गोष्टी सांगितल्या. रोहितसह सर्वच खेळाडूंनी दोघांच्याही सूचना लक्षपूर्वक ऐकल्या.

रोहितने नेटमध्ये नव्या आणि जुन्या चेंडूंवर सराव केला. गाबा मैदानावर सरावाच्या वेळी रोहितने फटक्यांमध्ये सुधारणा केल्याचे जाणवले. तो डावाला सुरुवात करणार की सहाव्या स्थानावर फलंदाजीला येणार, हा प्रश्न मात्र कायम आहे.

लोकेश राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पुन्हा एकदा नव्या चेंडूवर फलंदाजीचा सराव केला. त्याच वेळी रोहित जुन्या कुकाबुरा चेंडूवर खेळत राहिला. नंतर त्याने नवीन चेंडूवर सराव केला. गाबाच्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर गवत आहे. ही खेळपट्टी पारंपरिक ऑस्ट्रेलियन खेळपट्टी मानली जाते. यावर वेग आणि उसळी पाहायला मिळते. चेंडू हवेत सतत फिरत असतो.

शमी खेळण्याची शक्यता नाहीचदुसरीकडे मोहम्मद शमी कसोटीसाठी सध्या फिट नसल्याची माहिती आहे.  रणजी करंडक आणि मुश्ताक अली करंडकाचे काही सामने खेळल्यानंतर लाल चेंडूच्या क्रिकेटसाठी सध्या तयार नसल्याचे शमीला वाटत असावे. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, शमीच्या पायांवर सूज येत-जात आहे. तो अधिक स्थानिक सामने खेळू इच्छितो. तो आता बंगालकडून २१ डिसेंबरपासून विजय हजारे करंडक सामने खेळेल.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ