Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित ठरला फ्लॉप, पण लोकेश राहुलनं झळकावलं खणखणीत शतक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियात सलामीत बदल पाहायला मिळेल, हे निश्चित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 14:58 IST

Open in App

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियात सलामीत बदल पाहायला मिळेल, हे निश्चित आहे. खराब फॉर्माशी झगडत असलेल्या लोकेश राहुलला डच्चू दिल्यानंतर रोहित शर्माचे कसोटीतील सलामीचे स्थान पक्के झाले होते. त्याच्या जोडीला मयांक अग्रवाल हा जुनाच भिडू असणार आहे. पण, रोहितला सराव सामन्यात आलेले अपयश संघ व्यवस्थापनाचे चिंता वाढवणारे आहे, तर दुसरीकडे संघातून डच्चू मिळालेल्या लोकेश राहुलने विजय हजारे चषक स्पर्धेत दमदार शतकी खेळी करताना पुनरागमनासाठी दार ठोठावले आहेत.

कर्नाटकचे प्रतिनिधित्व करताना राहुलने केरळविरुद्धच्या सामन्यात 122 चेंडूंत 131 धावा केल्या. राहुलने 10 चौकार व 2 षटकार खेचले. त्याने पहिल्या 50 धावा 68 चेंडूंत केल्या. त्यानंतर त्याला शतक पूर्ण करण्यासाठी केवळ 40 चेंडूंचा सामना करावा लागला.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात अध्यक्षीय एकादश संघ मैदानात उतरला आणि त्यात रोहितने सलामी केली. मात्र, अवघ्या दोन चेंडूंचा सामना करून रोहित माघारी परतला. तीन दिवसीय सराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवसात फॅफ ड्यु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एडन मार्कराम ( 100), टेंबा बवुमा ( 87*) आणि वेर्नोन फिलेंडर ( 48) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर आफ्रिकेनं 6 बाद 279 धावांत डाव घोषित केला. धमेंद्रसिंग जडेजानं ( 3/66) सर्वाधिक विकेट घेतल्या. 

त्यानंतर आजच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. रोहित आणि मयांक अग्रवाल हे सलामीला आले. सलामीवीर म्हणून कसोटीत रोहितची कामगिरी कशी होते याची उत्सुकता होती. पण, दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर रोहित खाते न उघडता माघारी परतला. फिलेंडरने त्याला क्लासेनकरवी झेलबाद केले.

कसोटी मालिकेचे वेळापत्रकपहिला सामनाः 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासूनदुसरा सामनाः 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासूनतिसरा सामनाः 19 ते 23 ऑक्टोबर - रांची, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून

  • भारताचा कसोटी संघ : विराट कोहली, मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुबमन गिल.

 

  • दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघः फॅफ ड्यू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड
टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्मालोकेश राहुल