पार्ल (द. आफ्रिका) : सात वर्षांत पहिल्यांदाच विराट कोहली केवळ फलंदाज म्हणून भारतीय संघात खेळणार, तेही लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार असून विराट तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येईल. या सामन्यात कोहलीच्या प्रत्येक हालचालींवर चाहत्यांची नजर असेल. त्याचवेळी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याला ऐनवेळी संपूर्ण मालिकेत विश्रांती देण्यात आल्याने दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी कमकुवत झाली.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत राहुलच्या साथीने अनुभवी शिखर धवन सलामीला येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला पदार्पणाची संधी मिळणार का, याकडेही लक्ष असेल. विराटने दोन वर्षांपासून शतक झळकावले नाही. कर्णधारपदातून मोकळा झाल्यामुळे त्याच्याकडून फटकेबाजी अपेक्षित आहे. विराट फलंदाज असला तरी राहुल व उपकर्णधार जसप्रीत बुमराह यांना मार्गदर्शन करताना दिसेल.
नवा कर्णधार, सहयोगी स्टाफला ही मालिका जिंकून २०२३ च्या विश्वचषकाची तयारी करावी लागेल. भारताने मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळली होती. यानंतर दुय्यम दर्जाने भारतीय संघ श्रीलंकेत जुलैमध्ये खेळून आला. राहुलने इंग्लंडविरुद्ध मधल्या फळीत फलंदाजी केली होती. धवनने टी-२० तील स्थान गमावल्याने त्याला स्वत:ला सिद्ध करावे लागेल.
द. आफ्रिकेची फलंदाजी क्विंटन डीकॉक, कर्णधार तेम्बा बवुमा एडेन मार्करम व रासी वान डेन दुसेन यांच्यावर अवलंबून असेल. कार्यभार व्यवस्थापन अंतर्गत रबाडाला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी इतर कोणाची निवड झाली नाही. तरी, अतिरिक्त फिरकी गोलंदाज म्हणून जॉर्ज लिंडेला संघात स्थान देण्यात आले असल्याचे यजमानांनी म्हटले.
श्रेयस-सूर्या यांच्यात चुरस
चौथ्या स्थानासाठी श्रेयस आणि सूर्यकुमार यादव यांच्यात चुरस असेल. ऋषभ पंत पाचव्या आणि व्यंकटेश अय्यर सहाव्या स्थानावर खेळेल. फिरकीची जबाबदारी युजवेंद्र चहल आणि अश्विन यांच्याकडे असेल.
बुमराह, भुवनेश्वर हे वेगवान मारा सांभाळणार असून, तिसरा गोलंदाज म्हणून दीपक चाहर, शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यापैकी एकाची वर्णी लागेल. मोहम्मद सिराजही फिट आहे.
मागच्या दौऱ्यात भारताने वन-डे मालिकेत यजमानांना ५-१ ने पराभूत केले होते. तेम्बा बावुमा आणि क्विंटन डिकॉक हे फलंदाजीत, तर मार्को येनसन गोलंदाजीत भारतीयांना त्रस्त करू शकतात.
भारत : लोकेश राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत, ईशान किशन, युजवेंद्र चहल, रविचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव आणि नवदीप सैनी.
दक्षिण आफ्रिका : तेम्बा बावुमा (कर्णधार), केशव महाराज, क्विंटन डिकॉक, झुबेर हमजा, मार्को येनसन, जान्नेमन मलान, सिसांडा मगाला, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, वेन पारनेल, एंडिले फेलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, जॉर्ज लिंडे, तबरेज शम्सी, रासी वान डेर दुसेन आणि काइल वेरेने.
आमने-सामने
एकूण सामने ८४
भारत विजयी ३५
द. आफ्रिका विजयी ४६
अनिर्णीत ०३
भारताचे यश ४३.२%
द. आफ्रिकेत कामगिरी
एकूण वन डे ३४
विजयी १०
पराभव २२
अनिर्णित ०२