Join us  

IPL 2024 च्या तोंडावर दुखापतीची मालिका; सुरुवातीच्या सामन्यांना स्टार खेळाडू मुकणार

२२ मार्चपासून आयपीएलचा १७ वा हंगाम खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 6:52 PM

Open in App

IPL 2024: २२ मार्चपासून आयपीएलचा १७ वा हंगाम खेळवला जाणार आहे. मात्र त्यापूर्वी अनेक संघांना खेळाडूंच्या दुखापतीमुळे फटका बसला आहे. काही खेळाडू दुखापतीमुळे तर काही इतर कारणांमुळे सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर होऊ शकतात. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने असतील. पण, आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वीच काही संघांची डोकेदुखी वाढली आहे. कारण काही खेळाडू दुखापतीमुळे तर काही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमुळे आयपीएलमधील सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

  1. लोकेश राहुल - भारतीय संघाचा फलंदाज लोकेश राहुल मागील काही कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. राहुल इंग्लंडविरूद्धचा केवळ एक कसोटी सामना खेळू शकला. लोकेश राहुल शेवटच्या वेळी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळताना दिसला होता. मागील आयपीएल हंगामात राहुलला दुखापत झाली होती, त्यामुळे तो निम्म्या स्पर्धेला मुकला. आता आयपीएल २०२४ च्या आधी दुखापतीमुळे त्याला सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागू शकते. 
  2. राशिद खान- अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू राशिद खानला पाठीच्या दुखापतीने बराच कालावधी क्रिकेटपासून दूर ठेवले. त्यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आणि सध्या तो विश्रांती घेत आहे. या दुखापतीमुळे राशिद खान बीग बॅश लीग २०२३ आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळू शकला नाही. पीएसएलमध्ये तो लाहोर कलंदर्सच्या संघाचा भाग आहे. त्यामुळे राशिद आयपीएल २०२४ मध्ये खेळणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. 
  3. मथिश पाथिराना - श्रीलंकेचा धारदार गोलंदाज मथिश पाथिराना देखील दुखापतीचा सामना करत आहे. आयपीएलच्या मागील हंगामात आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जकडून १९ बळी घेणाऱ्या पाथिरानाला अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्याला मुकला. दुखापतीतून बरे होण्यासाठी त्याला काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. 
  4. डेव्हिन कॉनवे - मागील आयपीएल हंगामात अर्थात आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी न्यूझीलंडचा डेव्हिन कॉनवे सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने १६ सामन्यांमध्ये ६७२ धावा कुटल्या. मात्र मागील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत कॉनवेच्या अंगठ्याला दुखापत झाली अन् चेन्नईच्या संघालाही मोठा धक्का बसला. 
  5. सूर्यकुमार यादव - मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे जानेवारीमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सूर्यकुमार सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. तो पहिल्या २ किंवा ३ सामन्यांसाठी मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग नसण्याची दाट शक्यता आहे. 
  6. मॅथ्यू वेड - ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज मॅथ्यू वेड आयपीएल २०२२ मधील चॅम्पियन संघ गुजरात टायटन्सचा भाग होता. मागील आयपीएल हंगामात तो खेळू शकला नाही. वेडने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, २१ ते २५ मार्च दरम्यान खेळल्या जाणाऱ्या शेफिल्ड शिल्ड लीगच्या अंतिम सामन्यात तो तस्मानियाकडून खेळेल. त्यामुळे तो गुजरात टायटन्सच्या पहिल्या एक-दोन सामन्यांतून बाहेर राहू शकतो. शुबमन गिलच्या नेतृत्वात प्रथमच गुजरातचा संघ दिसणार आहे. 
टॅग्स :आयपीएल २०२४सूर्यकुमार अशोक यादवलोकेश राहुलमुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्स