Join us  

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राष्ट्रीय संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची शोधाशोध सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 4:46 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राष्ट्रीय संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची शोधाशोध सुरू केली आहे. राहुल द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून अनेक नावं चर्चेत आहेत.  व्हीव्हीएस लक्ष्मण आणि गौतम गंभीर ही भारतीय दिग्गजांची नावं यात आहेत. रिकी पाँटिंग, जस्टिन लँगर, स्टीफन फ्लेमिंग यांचीही नावे चर्चेत आहेत. पण, पाँटिंग व लँगर यांनी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला नसल्याचे स्पष्ट केले. स्टीफन फ्लेमिंगचेही अद्याप निश्चित नाही. त्यामुळे BCCI च्या रडारवर नंबर १ उमेदवार कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) असल्याचे वृत्त आहे. 

दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, गंभीर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास उत्सुक आहे. पण, त्यासाठी अर्ज करण्यापूर्वी भारताच्या माजी फलंदाजाने 'एक अट' ठेवली आहे. गौतम गंभीरला संघ निवडण्याची पूर्ण मुभा हवी आहे आणि त्याने सुचवलेले खेळाडू त्याला हवे आहेत, याची हमी दिल्यानंतर तो अर्ज करण्यास  इच्छुक असल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.  

मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे आहे. यासाठी किती जणांनी अर्ज केले आहेत, हे  अद्याप कळलेले नाही. BCCI ने अलीकडेच मुख्य प्रशिक्षकपदासाठी रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांच्याशी संपर्क साधण्यास नकार दिला होता. गंभीरने या पदासाठी अर्ज केला आणि भूमिका स्वीकारली, तर त्याला KKRचे मार्गदर्शक म्हणून आपले स्थान सोडावे लागेल. गंभीरने कर्णधार म्हणून KKR सोबत दोन वेळा आयपीएल जिंकले आहे.  

 'दैनिक जागरण'ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, गौतम गंभीरने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरून केकेआरचा मालक शाहरूख खानशी चर्चा केली नाही. जर तो या पदासाठी अर्ज करणार असेल तर नक्कीच शाहरूखचे मत विचारात घेईल. कारण की, गौतम गंभीरने पुढच्या १० वर्षांपर्यंत केकेआरच्या फ्रँचायझीसोबत राहावे असे शाहरूखला वाटते. 

BCCI च्या प्रशिक्षकपदासाठी अटी -- नवीन प्रशिक्षक हा १ जुलै, २०२४ ते ३१ डिसेंबर २०२७ या काळासाठी असणार आहे. - प्रशिक्षक पदासाठी उच्छुक उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे.- कमीतकमी ३० कसोटी, ५० वनडे सामने खेळण्याचा अनुभव असावा तसेच कमीतकमी दोन वर्षांचा एखाद्या पूर्णवेळ संघाचा प्रशिक्षक पदाचा अनुभव असावा.

टॅग्स :गौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयकोलकाता नाईट रायडर्स