कॅरिबियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्यात ट्रिनबागो नाईट रायडर्सने गयाना अमेझॉन वॉरियर्सचा ३ विकेट्सने पराभव केला. ट्रिनबागोने विक्रमी पाचव्यांदा सीपीएलचे विजेतेपद जिंकले. या कामगिरीसह वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू किरॉन पोलार्डच्या नावावर एक मोठा विश्वविक्रम नोंदवण्यात आला. टी-१० क्रिकेटमध्ये सर्वाधिक टॉफी जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याच्या नावावर होता.
निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली ट्रिनबागो नाईट रायडर्स संघ विजेता झाला असला तरी या सामन्यात किरॉन पोलार्डने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आपल्या संघाला जेतेपदापर्यंत पोहोचवून नवा इतिहास रचला. किरॉन पोलार्ड टी२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विजेतेपदे जिंकणारा पहिला खेळाडू बनला आहे. पोलार्डचे हे १८ वे टी२० विजेतेपद ठरले. यासह, त्याने ड्वेन ब्राव्होचा १७ टी-२० जेतेपदे जिंकण्याचा विश्वविक्रम मोडला. पोलार्ड आतापर्यंत १५ संघांसाठी खेळला असून एकूण १८ ट्रॉफी जिंकल्या आहेत. सीपीएल व्यतिरिक्त, पोलार्डने आयपीएल, बीपीएल, एमएलसी, सीएसए टी-२० चॅलेंज आणि आयएलटी२० मध्येही जेतेपदे जिंकली आहेत.
टी-२० मध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारे खेळाडू
नाव | जेतेपद |
किरोन पोलार्ड | १८ |
ड्वेन ब्राव्हो | १७ |
शोएब मलिक | १६ |
सुनील नारायण | १२ |
आंद्रे रसेल | ११ |
रोहित शर्मा | ११ |
कॉलिन मुनरो | १० |
सीपीएल २०२५ मध्ये ट्रिनबागोला विजेतेपद मिळवून देण्यात पोलार्ड सिंहाचा वाटा आहे. त्याने सीपीएल २०२५ मध्ये त्याच्या संघासाठी १३ सामन्यांच्या ११ डावात ५४.७१ च्या सरासरीने आणि १७४.०९ च्या स्ट्राईक रेटने ३८३ धावा काढल्या. तो या हंगामात ट्रिनबागोसाठी सर्वाधिक धावा काढणारा चौथा खेळाडू ठरला. गयाना विरुद्धच्या अंतिम सामन्यात, त्याने १२ चेंडूत २१ धावांची वादळी खेळी केली.