सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत कर्नाटक विरुद्ध हरयाणा यांच्यात उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. या सामन्यात कर्नाटकच्या अभिमन्यू मिथूननं अखेरच्या षटकात पाच विकेट्स घेतल्या. त्यात हॅटट्रिकचा समावेश आहे. त्याच्या या गोलंदाजीनंतरही हरयाणा संघानं 20 षटकांत 8 बाद 194 धावा केल्या. पण, या सामन्यात मिथूननं अखेरच्या षटकात घेतलेले पाच बळी लक्षवेधी ठरली.
प्रथम फलंदाजी करताना हरयाणाच्या फलंदाजांची फटकेबाजी पाहायला मिळाली. चैतन्य बिश्नोईनं 35 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 55 धावा केल्या. त्याला हर्ष पटेलनं 34 धावा करून चांगली साथ दिली. त्यानंतर हिमांशू राणा आणि राहुल तेवाटिया यांनी दमदार खेळ केला. हिमांशूनं 34 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचत 61 धावा केल्या. राहुलनं 32 धावा केल्या. हरयाणाचा संघ दोनशे धावांचा पल्ला सहज पार करेल असे वाटत होते. पण, अभिमन्यू मिथूननं अखेरच्या षटकात पहिल्या चार चेंडूंवर चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्यानं अखेरच्या चेंडूवर विकेट घेत, एकाच षटकात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला.
रणजी करंडक, विजय हजारे चषक आणि सय्यद मुश्ताक अली चषक या तीनही स्पर्धांमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. त्यानं 2009मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध रणजी स्पर्धेत, 2019मध्ये तामीळनाडू विरुद्ध विजय हजारे स्पर्धेत हॅटट्रिक नोंदवली होती.
पाहा व्हिडीओ