Join us

कपिल, गायकवाड यांचा महिला संघ कोच निवड पॅनलमध्ये समावेश?

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी नवा कोच शोधण्याची मोहीम बीसीसीआयने सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 04:27 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघासाठी नवा कोच शोधण्याची मोहीम बीसीसीआयने सुरू केली आहे. बोर्डाच्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) याप्रकरणी प्रक्रिया राबविण्यास नकार दिल्यास महान खेळाडू कपिलदेव आणि अंशुमन गायकवाड यांचा समावेश असलेली निवड समिती नव्या कोचची निवड करेल, अशी दाट शक्यता आहे.अनुभवी खेळाडू मिताली राजसोबत वाद होताच चर्चेत आलेले संघाचे अंतरिम कोच रमेश पोवार यांचा तीन महिन्यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपला. बोर्डाने त्याआधीच नव्या कोचसाठी अर्ज मागविले असून आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर आहे. नियुक्तीआधी मुलाखत घेण्याची नियमानुसार जबाबदारी सीएसीची असते. पण या समितीत असलेले सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची व्यस्तता लक्षात घेता समिती मुलाखत घेण्यास नकार देऊ शकते. सचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांना यासंदर्भात आधी विचारणा करण्यात येईल. या तिघांनी नव्या कोचची निवड करण्यास लेखी होकार कळविल्यास समितीमार्फतच नवा कोच निवडला जाईल. तथापि बोर्डाच्या सूत्रानुसार सीएसी मुलाखत घेण्यास नकार देईल, असे मानले जाते. याआधी ज्युनियर संघासाठीदेखील कोच निवडण्यास सीएसीने नकार दिला होता. सचिनचा मुलगा अर्जुन हा निवडीसाठी उपलब्ध होता, त्यामुळे सचिनने तर आधीच माघार घेतली.ही शक्यता लक्षात घेता बीसीसीआयने पाच जणांची नावे निश्चित केली. या पाच जणांच्या उपलब्धतेवर निवड समिती बनू शकेल. याशिवाय नवे सदस्य ‘लाभाचे पद’ या संज्ञेखाली तर अडकणार नाहीत ना, याची खबरदारी घेण्यात येत आहे.इंग्लंडविरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताने पराभवाचे तोंड पाहताच मिताली आणि पोवार यांच्यातील वादाला तोंड फुटले. मितालीने सीओए सदस्य डायना एडल्जी यांच्याकडे पोवार यांची लेखी तक्रार करीत पोवार आपले करिअर नेस्तनाबूत करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला होता. मितालीने नंतर एडल्जी यांच्यावरही पक्षपातीपणाचा आरोप केला. पोवार यांनी मितालीच्या आरोपाचे उत्तर देत ती वेगळ्या वळणाची खेळाडू असून तिला सांभाळणे कठीण असल्याचे म्हटले होते. सीओएने ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळायला हवे होते, तसे करण्यात अपयश आल्याची टीका बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने केली. महिला क्रिकेटमधील वादाची इतकी नाचक्की झाल्यामुळे सीएसी नवा कोच निवडण्यास उत्सुक राहील, असे वाटत नसल्याचे अधिकाºयाचे मत होते.याआधी कुंबळे-कोहली प्रकरणातही असेल घडले होते. कुंबळे यांनी कोचपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोहलीने बीसीसीआय पदाधिकाºयांसोबत मुजोरी करीत रवी शास्त्री यांचीच कोचपदी वर्णी लावून घेतली. या प्रकारावर सीएसीने नाराजी वर्तविली होती. शास्त्री यांची नियुक्ती करताना सीएसीला विश्वासात न घेतल्याची भावना असल्यामुळे महिला कोच निवडताना सीएसीला काही स्वारस्य उरले असेल, असे वाटत नाही. (वृत्तसंस्था)>सुनील गावसकर, कपिलदेव, अंशुमन गायकवाड, शुभांगी कुलकर्णी, शांता रंगास्वामी ही काही संभाव्य नावे असून बीसीसीआयचा त्यांच्याशी संपर्क सुरू आहे. असे झाल्यास तीन सदस्यांची समिती गठित करण्यात येईल. गावसकर मात्र मीडिया जबाबदारीमुळे पॅनलमध्ये राहण्याची शक्यता कमी आहे. गावसकर हे पसंतीचे व्यक्तिमत्त्व असले तरी त्यांच्यामागे कामाचा प्रचंड व्याप आहे. कपिलदेव यांचा भारतीय महिला क्रिकेट हा आवडता विषय आहे. अंशुमन आणि शुभांगी ही क्रिकेटमधील सन्माननीय नावे आहेत.

टॅग्स :कपिल देव