Join us

धोनीइतकी क्रिकेटसेवा कुणालाही जमणार नाही; 'कॅप्टन कूल'वर 'देव' प्रसन्न

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून आजच्या घडीला महेंद्रसिंग धोनीचे नाव चटकन तोंडावर येईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 12:29 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून आजच्या घडीला महेंद्रसिंग धोनीचे नाव चटकन तोंडावर येईल. 1983 नंतर भारताने प्रथमच वन डे वर्ल्ड कप जिंकला तो धोनीच्या नेतृत्वाखालीच, तत्पूर्वी 2007मध्ये धोनीनं भारताला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकून दिला. सध्या धोनी कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त असला तरी अडचणीच्या काळात संघासाठी तो धावून येतो. याची प्रचिती अनेकदा आलेली आहे. त्यामुळेच 1983च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांना धोनीचे कौतुक करण्याचा मोह आवरता आलेला नाही. 

ते म्हणाले,''धोनीविषयी मी काय बोलू...त्याने उत्तमरित्या देशाची सेवा केली आहे आणि त्याचा आदर करायलाच हवा. तो आणखी किती काळ खेळेल हे कुणीच सांगू शकत नाही आणि त्याचे शरीर कितीकाळ कामाचा ताण पेलेल, हेही सांगणे अवघड आहे. पण, धोनीइतकी क्रिकेटसेवा कुणालाही जमणार नाही. त्यासाठी त्याचा आदर करायला हवा आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आशा करतो की तो हाही वर्ल्ड कप जिंकेल.'' 

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 400 हून अधिक विकेट आणि 5000 धावा करणारे एकमेव खेळाडू असलेल्या कपिल देव यांनी विराट कोहलीला वर्ल्ड कप जिंकणे सोपी गोष्ट नसल्याचे सांगितले. ते म्हणाले,''भारतीय संघ चांगल्या फॉर्मात आहे. पण, वर्ल्ड कपमधील भारतीय संघाची वाटचाल तितकी सोपी नाही. एकसंघ होऊन त्यांना खेळ करावा लागेल. संघातील एकाही खेळाडूला दुखापत होऊ नये ही अपेक्षा. त्यांना नशिबाची साथ मिळाल्यास, विजय पक्का मिळेल.'' 

भारताच्या वर्ल्ड कप संघात निवड समितीने रिषभ पंतच्या नावावर काट मारून दिनेश कार्तिकला संधी दिल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. त्याबाबत कपिल देव म्हणाले,''निवड समितीने त्यांचे काम केले आहे आणइ त्यांच्या निर्णयाचा आदर करायला हवा. त्यांनी रिषभ पंतऐवजी कार्तिकला घेतले, त्यांना हा निर्णय घ्यावासा वाटला. निवड समितीने चोख कामगिरी केली, असा विश्वास त्यांच्यावर दाखवायला हवा.''

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीकपिल देववर्ल्ड कप 2019विराट कोहली