Join us

केन विलियम्सनच्या खिलाडूवृत्तीवर इंग्लंडच्या गोलंदाजाचं प्रश्नचिन्ह, जाणून घ्या नेमकं काय घडलं

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे सुरु आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 17:16 IST

Open in App

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे सुरु आहे. या सामन्यात मार्नस लॅबुश्चॅग्नेनं आणखी एक शतकी खेळी करताना ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनीही प्रत्येकी 43 धावांची खेळी करताना संघाच्या धावसंख्येत हारभार लावला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 416 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना 1 धावा असताना माघारी पाठवलं. कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांनी किवींची पडझड थांबवली. मात्र, या खेळीत विलियम्सनच्या खिलाडूवृत्तीवर इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जाणून घ्या नेमकं काय घडलं...

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉर्नर आणि जो बर्न्स यांना साजेशी सुरुवात करून देता आली नाही. बर्न्स 9 धावांवर कॉलीन डी ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर वॉर्नर व लॅबुश्चॅग्ने या जोडीनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. वॉर्नर 74 चेंडूंत 4 चौकार लगावताना 43 धावांत माघारी परतला. नील वॅगनरनं स्वतःच्याच गोलंदाजीवर वॉर्नरला झेलबाद केले. लॅबुश्चॅग्नेनं तिसऱ्या विकेटसाठी स्टीव्ह स्मिथसह शतकी भागीदारी केली. वॅगनरनं ही जोडी फोडली. त्यानं स्मिथला 43 धावांवर माघारी पाठवले.

लॅबुश्चॅग्नेनं 240 चेंडूंत 18 चौकार व 1 षटकार खेचून 143 धावा केल्या. मॅथ्यू वेडला अप्रतीम चेंडूवर टीम साऊदीनं त्रिफळाचीत करून माघारी पाठवले. त्यानंतर ट्रॅव्हीस हेडनं ( 56) अर्धशतकी खेळी करून संघाचा डाव सावरला. लॅबुश्चॅग्नेलाही वॅगनरनं बाद केले. त्यानंतर टीम पेन ( 39), मिचेल स्टार्क ( 30) यांनी संयमी खेळ केला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 416 धावांत गडगडला. किवींच्या टीम साऊदी ( 4/93) आणि  नील वॅगनर ( 4/92) यांनी चार विकेट्स घेतल्या. 

किवींच्या जीत रावल आणि टॉम लॅथम यांना अवघ्या एका धावेवर जोश हेझलवूड व मिचेल स्टार्क यांनी माघारी टाकले. त्यानंतर विलियम्सन आणि टेलर यांनी अर्धशतकी भागीदारी करताना किवींचा डाव सावरला. पण, 14 धावांवर असताना मॅथ्यू वेडच्या गोलंदाजीवर चेंडू विलियम्सनच्या बॅटीचा कड घेऊन यष्टिरक्षकाच्या हाती विसावला होता. पण, स्मिथ वगळता कोणीही बाद झाल्याची अपील केलं नाही आणि DRS ही घेतला नाही. स्निको मीटरमध्ये चेंडू आणि बॅट यांच्यात घर्षण झाल्याचे दिसले. त्यावरून इंग्लंडच्या गोलंदाजानं विलियम्सनच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला.

टॅग्स :आॅस्ट्रेलियान्यूझीलंड