Join us

IPL 2020: 'विराट कंपनी'च्या शिलेदारामध्ये कोरोनाची लक्षणं, रिपोर्टकडे सगळ्यांचं लक्ष

विराट कोहलीच्या संघातील खेळाडूमध्ये आढळली कोरोनाची लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 11:20 IST

Open in App

सिडनी: कोरोना व्हायरसचं संक्रमण पूर्ण जगात झालेलं आहे. विशेष म्हणजे आता हा कोरोना व्हायरस सामान्य लोकांबरोबर क्रिकेटपटूंनाही आपल्या विळख्यात घेत असल्याचं पाहायला मिळतं आहे. न्यूझीलंड सामन्याच्या आधीच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनमध्येही कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्याला संघापासून वेगळं करण्यात आलं आहे. अजूनही त्याचा चाचणी अहवाल येणं बाकी आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा हा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन विराट कोहलीच्या आयपीएल टीममध्ये आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाची टीम दक्षिण आफ्रिकेवरून परतली आहे. आज सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम दाखल झाली असून, त्यात केनचा समावेश नाही. त्यानं काल रात्रीच संघाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घशाला त्रास होत असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर त्याचा COVID-19च्या तपासणीसाठी नमुना घेण्यात आला. 29 वर्षीय या खेळाडूच्या रिपोर्टची आता वाट पाहिली जात आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याचा पुन्हा संघात रुजू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.  क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, आमची वैद्यकीय टीम केनच्या घशाच्या संक्रमणावर उपचार करत आहे. आम्ही ऑस्ट्रेलिया सरकारच्या प्रोटोकॉलचं पालन करत आहोत, त्यामुळेच केनला वेगळं ठेवण्यात आलं आहे. त्याची तपासणी केल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल. 14 दिवसांनंतर केन परदेशातून परतला आहे. एकदा का त्याचे तपासणी अहवाल आल्यानंतर पुन्हा संघात कार्यरत व्हायचं की नाही हे ठरवलं जाईल. आता आम्ही अधिक काहीही सांगू शकत नाही. न्यूझीलंडच्याविरोधात पहिल्या वनडेमध्ये केनच्या ऐवजी सीन अबॉटला घेण्यात आलं आहे. आज दोन्ही संघांमध्ये पहिला सामना होणार आहे. सिडनीच्या मैदानावर हा सामना प्रेक्षकांशिवाय खेळला जाणार आहे.

टॅग्स :आॅस्ट्रेलिया