नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाने 13 जुलै 2002 मध्ये इंग्लंडमध्ये ऐतिहासिक नेट वेस्ट वन डे मालिका जिंकली होती. त्या सामन्यात युवराज सिंगसह अविस्मरणीय खेळी साकारणा-या मोहम्मद कैफने 16 वर्षांनंतर बरोबर त्याच दिवशी स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. नोव्हेंबर 2006 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताकडून अखेरचा सामना खेळला होता.
मधल्या फळीतील सक्षम फलंदाज असलेला कैफ चपळ क्षेत्ररक्षकही म्हणून ओळखला जातो. 2002साली इंग्लंडविरूद्धच्या कानपूर येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 125 वन डे सामन्यांत त्याच्या नावावर 2753 धावा आहेत आणि त्यात 2 शतक व 17 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याशिवाय त्याने 13 कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना 624 धावा केल्या आहेत.
कैफने ट्विट करून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने लिहीले की, क्रिकेट खेळायला सुरूवात केली तेव्हापासून भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न मी पाहिले होते. ते स्वप्न सत्यात उतरले, हे माझे भाग्य समजतो. बरोबर 190 दिवस मी देशाचे प्रतिनिधित्व केले. आज मी सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. तुम्हा सर्वांचे आभार.