T20 World Cup 2026 Final: आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय चाहत्यांचे विशेष लक्ष स्टार विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनकडे असणार आहे. आजच्या सामन्यात एक धाव करताच संजूच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला जाऊ शकतो.
धोनीच्या खास यादीत संजूची एन्ट्री
संजू सॅमसन सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून टीम इंडियासाठी महत्त्वाचा मॅच विनर ठरत आहे. फायनल सामन्यात तो फक्त एक धाव करताच टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेटकीपर म्हणून 1000 धावांचा टप्पा गाठेल. हा पराक्रम करणारा तो भारताचा दुसरा विकेटकीपर ठरेल. सध्या हा विक्रम फक्त महेंद्रसिंह धोनी यांच्या नावावर आहे. धोनीने विकेटकीपर म्हणून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1617 धावा केल्या आहेत.
सॅमसनच्या नावावर आधीच 1310 धावा
संजू सॅमसनने आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत 1310 धावा केल्या आहेत. मात्र त्यापैकी 999 धावा विकेटकीपर म्हणून नोंदल्या गेल्या आहेत. या धावांमध्ये 5 अर्धशतके आणि 3 शतके समाविष्ट आहेत.
वर्ल्ड कपमध्ये शानदार फॉर्म
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सॅमसनने आतापर्यंत 4 सामने खेळले असून 77.33 च्या सरासरीने 232 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे मागील दोन सामन्यांमध्ये त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्याने या स्पर्धेत 201.73 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता फायनल सामन्यात सॅमसनची कामगिरी कशी राहते आणि तो धोनीच्या विशेष यादीत आपले स्थान मिळवतो का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.