जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत जबरदस्त कामगिरी करून पहिले तीन सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला जोहान्सबर्ग येथील चौथ्या वनडेत पराभव पत्करावा लागला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या लढतीत भारताच्या फलंदाजांनी संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली होती. त्यानंतर गोलंदाजांनीही दक्षिण आफ्रिकेला अडचणीत आणले होते. मात्र युझवेंद्र चहलने टाकलेल्या 17 व्या षटकातील तो एक चेंडू सामन्याला कलाटणी देऊन गेला.
शतकवीर शिखर धवन, विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनीच्या दमदार खेळाच्या जोरावर या लढतीत भारतीय संघाने 50 षटकात 289 धावा उभारून दक्षिण आफ्रिकेसमोर 290 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळाने पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवावा लागला. सामना पुन्हा सुरू झाल्यावर दक्षिण आफ्रिकेला 28 षटकांत 202 धावांचे सुधारीत लक्ष्य दिले गेले. मात्र या आव्हानाचा पाठलाग करत असताना हाशीम अमला, कर्णधार मार्कराम आणि स्फोटक फलंदाज एबी डीव्हिलियर्स यांना भारतीय गोलंदाजांनी झटपट माघारी धाडले.
सामन्यावर भारतीय संघाचे नियंत्रण आहे असे वाटत होते. त्यावेळी 17 वे षटक टाकण्यासाठी युझवेंद्र चहल गोलंदाजीसाठी आला. त्याच्या त्या षटकातील एका चेंडूवर श्रेयस अय्यरने सीमारेषेवर क्लासेनचा झेल सोडला. दरम्यान, या षटकातील शेवटच्या चेंडूवर चहलने मिलरचा त्रिफळा उडवला आणि भारताच्या गोटात जल्लोषाला सुरुवात झाली. पण पंचांनी तिसऱ्या पंचांकडून चेंडूची वैधता तपासली असता तो नोबॉल ठरला आणि मोठा मासा भारतीय संघाच्या हातून निसटता. त्यानंतर फ्री हिटवर उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात मिलर बाद झाला. पण फ्री हिट असल्याने तो बचावला. या जिवदानाचा पुरेपूर फायदा उठवत मिलरने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली आणि सामन्याचे पारडे दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने झुकवले.