बर्मिंगहॅम, अॅशेस 2019 : आघाडीवर असूनही यजमान इंग्लंडला अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो स्टीव्हन स्मिथ. कारण या सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला नॅथन लिऑनने सहा विकेट्स घेत खिंडार पाडले आणि ऑस्ट्रेलियाने 251 धावांनी हा सामना जिंकला. पाच सामन्यांच्या मालिकेत यजमान इंग्लंडचा संघ 0-1 असा पिछाडीवर गेला आहे. पण, दुसऱ्या सामन्यापूर्वी त्यांना आणखी एक धक्का बसला आणि तो म्हणजे प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसनच्या दुखापतीचा. दुखापतीमुळे अँडरसन दुसऱ्या कसोटीत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. पण, त्वरीत त्याला सक्षम पर्याय इंग्लंडला सापडला आहे.
14 ऑगस्टपासून लॉर्ड्सवर सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पुनरागमनाचा प्रयत्न आहे. त्यांच्या या निर्धाराला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतीतून सावरला नाही, त्यामुळे त्याने दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात केवळ चार षटकं टाकून अँडरसन मैदनाबाहेर गेला होता. त्याच्या पोटरीला दुखापत झाली होती आणि MRIच्या अहवालात ही दुखापत बरी झाली नसल्याचे उघड झाले.
पण, त्याला पर्याय म्हणून जोफ्रा आर्चरचा विचार केला जाऊ शकतो. आर्चरने त्याच्या कामगिरीतून इंग्लंडच्या निवड समितीला तसा विचार करण्यास भाग पाडले आहे. मंगळवारी खेळल्या गेलेल्या एका सामन्यात आर्चरने 6 विकेट्स आणि शतकी खेळी अशी अष्टपैलू कामगिरी केली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतही इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाजाचा मान आर्चरने पटकावला होता. त्यामुळे त्याचा कसोटी संघातही समावेश करण्यात आला. पण, त्याला पहिली कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही. अँडरसनच्या दुखापतीमुळे आणि अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आर्चर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. ससेक्स सेकंड XI संघाचे प्रतिनिधित्व करताना आर्चरने 27 धावांत 6 विकेट्स घेत ग्लोसेस्टरशायर संघाचा डाव 79 धावांत गुंडाळला. त्यानंतर फलंदाजीतही चमक दाखवताना 99 चेंडूंत 108 धावा चोपल्या.