Jay Shah, ICC Chairman : भारतीय क्रिकेटला नवी उंची गाठून देणारे BCCI चे मावळते सचिव जय शाह यांनी आज ICC अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. भारतीय क्रिकेटनंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जय शाह यांची आजपासून नवी इनिंग सुरु झाली. ICC चे सर्वात तरुण अध्यक्ष बनण्याचा बहुमान त्यांना मिळाला. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी त्यांनी पदभार स्वीकारला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे ICC च्या अध्यक्षपदी विराजमान होणारे जय शाह हे पाचवे भारतीय ठरले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ट्विट करत सर्वांचे आभार मानले. तसेच काही इतर बाबींवरही भाष्य केले.
जय शाह ट्विटमध्ये काय म्हणाले?
जय शाह यांनी ट्विटमध्ये लिहिले, "आज ICC चेअरमन म्हणून माझ्या भूमिकेची सुरुवात करताना मला खूप सन्मान वाटतो. क्रिकेट हा एक असा खेळ आहे जो जगभरातील लाखो लोकांना एकत्र आणतो. हा एक अफाट जबाबदारी आणि संधीचा क्षण आहे. आम्ही क्रिकेटच्या परिवर्तनाच्या टप्प्यात प्रवेश करत असताना, खेळाचा जागतिक स्तरावर ठसा वाढवण्यासाठी आणि त्याच्या विकासासाठी नवीन मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मी आयसीसी संघ आणि सदस्य देशांसोबत जवळून काम करण्यासाठी वचनबद्ध आहे. तळागाळातील उपक्रमांपासून ते बड्या स्पर्धांपर्यंत क्रिकेटला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे माझे व्हिजन आहे. जगभरातील चाहत्यांच्या अपेक्षांची पूर्तता होईल असा माझा प्रयत्न राहिल."
"कसोटी क्रिकेट हे नेहमीच या खेळातील परमोच्च शिखर ठरले आहे. चाहत्यांमध्ये कसोटी क्रिकेटचे आकर्षण वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, त्यासोबतच कसोटी क्रिकेटची प्रतिमा जपण्यासाठीही आम्ही समर्पित भावनेने काम करू. आम्ही खेळाला नवीन क्षितिजावर नेत असताना महिला क्रिकेट हा आमच्या वाढीच्या धोरणाचा आधारस्तंभ असेल. मी सर्व सभासद मंडळांचे त्यांच्या विश्वास आणि समर्थनाबद्दल आभारी आहे. आम्ही क्रिकेटला अभूतपूर्व उंचीवर नेण्याचा, पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आणि या महान खेळाद्वारे साऱ्यांना एकोप्याच्या भावनेने एकत्र आणण्याचा प्रयत्न करू," असेही जय शाह यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, २०१९ मध्ये जय शाह यांना बीसीसीआय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती. जय शाह यांनी जवळपास ६ वर्षे बीसीसीआयमध्ये काम केले आहे. यासोबतच ते जानेवारी २०२१ पासून आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही झाले होते. आता जय शाह आयसीसीसाठी काम करणार आहे. त्यांनी ग्रेग बार्कले यांची जागा घेतली आहे, जे सलग दोन वेळा आयसीसीचे अध्यक्ष होते. जय शाह यांच्या कार्यकाळातील पहिली आयसीसी स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, ज्याबाबत निर्णय घेणे अद्याप बाकी आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, परंतु भारताला त्यांचे सामने हायब्रीड मॉडेलवर खेळवून दिले जाण्याची शक्यता आहे. यासाठी पाक क्रिकेट बोर्डाने काही अटीही घातल्याचे सांगितले जात आहे.