कोलंबो, दि. 29 - कसोटी आणि वनडे मालिकेत भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवामुळे श्रीलंका निवड समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला आहे. श्रीलंका क्रीडा मंत्रालयाने या बद्दलची माहिती दिली. राजीनामा देणाऱ्यामध्ये निवड समिती अध्यक्ष सनथ जयसुर्यासह रंजीत मदुरासिंघे, रोमेश कालूवितर्णा, असंका गुरुसिंघा आणि एरिक उपाशांता यांनीही राजीनामा दिला आहे.
श्रीलंका क्रीडा बोर्डाच्या एका आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, निवड समितीच्या सदस्यांनी दिलेले राजीनामा मंगळवारी रात्रीपर्यंत स्विकारण्यात आलेले नाहीत. जोपर्यंत राजीनामा स्विकारला जाणार नाही तोपर्यंत ते आपल्या पदावर कायम राहतील. राजीनामा स्विकारला तरीही सहा सप्टेंबर पर्यंत त्यांना आपल्या पदावर कायम राहवे लागणार आहे. सहा सप्टेंबर रोजी भारत दौऱ्याचा शेवट होणार आहे.
दरम्यान, जसप्रीत बुमराहचे पाच बळी आणि रोहित शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा सहा गड्यांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह पाच एकदिवसीय सामन्याची मालिका भारताने 3-0 नं खिशात घातली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा सलग पाचवा एकदिवसीय मालिका विजय आहे. कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेत भारताने श्रीलंकेला लोळवलं. 2019 च्या विश्वचषकात प्रवेश मिळवण्यासाठी या मालिकेतील दोन सामने श्रीलंकेला जिंकायचे आहेत. पण श्रीलंकेची सद्याची स्थिती पाहता ते अशक्य दिसतेय. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील श्रीलंकेचा पराभव पाहून सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षकही नाराज झाले होते. त्यांनी मैदानावर बाटल्या फेकत आपला राग व्यक्त केला. भारताला विजयासाठी 8 धावांची गरज असताना हा सर्व प्रकार घडला. प्रेक्षकांनी घातलेल्या गोंधळामुळे सामना अर्धा तास थांबवावा लागला. त्यानंतर प्रेक्षकांना मैदानातून बाहेर काढले गेले आणि सामना पुन्हा सुरु केला गेला.