Jasprit Bumrah Team India BCCI, IND vs ENG: भारत आणि इंग्लंडमध्ये २० जूनपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी बीसीसीआय लवकरच संघ निवडणार आहे. पण या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टीम इंडियाला आणि बीसीसीआयचे टेन्शन वाढवले आहे. त्याने बीसीसीआयला सांगितले आहे की त्याच्या तंदुरूस्तीचा भाग म्हणून त्याला काही काळ विश्रांतीची गरज आहे. कारण त्याचे शरीर आता जास्त कामाचा भार सहन करू शकत नाही. अशा परिस्थितीत तो इंग्लंड दौऱ्यावर ठराविक सामन्यांपेक्षा जास्त कसोटी सामने खेळू शकणार नाही. हा BCCI साठी मोठा धक्का आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे बीसीसीआय बुमराहसाठी नवीन पर्याय शोधत आहे.
बुमराह किती सामने खेळणार?
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड एक-दोन दिवसात केली जाईल. त्याआधीच भारतीय क्रिकेट संघाचे निवडकर्ते गोंधळून गेले आहेत. एकाच वेळी अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. सर्वप्रथम BCCIला नवा कसोटी कर्णधार निवडायचा आहे. यासोबतच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जागी खेळाडूंचा शोध घेतला जात आहे. याचदरम्यान, जसप्रीत बुमराह सर्व सामने खेळत नसल्याच्या बातमीने संघ अडचणीत आला आहे. बुमराहने इंग्लंड दौऱ्यावर तीनपेक्षा जास्त सामने खेळणार नसल्याचे सांगितले आहे.
बुमराह नेमकं काय म्हणालाय?
संबंधितांशी बैठकीत बुमराह म्हणाला की, सध्या त्याचे शरीर तीन कसोटी सामन्यांपेक्षा जास्त काळ खेळण्यासाठी सज्ज नाही. बुमराहने ऑस्ट्रेलियामध्ये पाचही कसोटी सामने खेळले होते. त्याने तिथे अनेकवेळा लांब स्पेलही टाकली. पण पाचव्या कसोटीदरम्यान त्याला पाठीला दुखापत झाली आणि तो सामन्याबाहेर गेला. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजी खूपच कमकुवत दिसली आणि टीम इंडियाने सामना व मालिका गमावली. इंग्लंडचा दौराही मोठा आहे. अशा वेळी बुमराहला विश्रांती दिली गेली तर त्याच्या जागी कोण, याबाबत निवडकर्ते विचार करत आहेत.